राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर ‘वॉच’; ३० जानेवारीपर्यंत मागितले विवरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:50 AM2017-12-23T10:50:52+5:302017-12-23T11:18:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिकाऱ्यांची संपत्ती किती, याची आकडेवारी शासनाकडे नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे विवरण आॅनलाईन गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. चालू वर्षाच्या अचल मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याची डेडलाइन ३० जानेवारी २०१८ आहे.
केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने अखिल भारतीय सेवा (वर्तणूक) नियम, १९८६ मधीेल नियम १६ (२) नुसार आयएएस अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर लक्ष ठेवण्याची धुरा सांभाळली आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना २०१६ या वर्षीच्या अचल मालमत्ता संपत्तीचे विवरण डिजिटल स्वाक्षरीद्वारे आॅनलाईन पाठवावे लागणार आहे. त्याकरिता आयएएस अधिकाऱ्यांना स्वतंत्र पासवर्ड देण्यात आले आहेत. डिजिटल स्वाक्षरीशिवाय विवरणपत्रे पाठविता येणार नाही, ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. काही कारणास्तव स्वाक्षरी करू शकले नाहीत, अशा अधिकाऱ्यांना अचल मालमत्तांची विवरणपत्रे स्कॅन करून आॅनलाईन पाठवावी लागतील. आॅनलाईन माहिती पाठविताना काही अडचणी आल्यास संगणकीय प्रणालीवर होम पेजमध्ये टॅबद्वारे ई-मेलने माहिती पाठविता येणार आहे. संपत्तीची माहिती आॅनलाईन पाठविल्यास, हार्ड कॉपी सादर करण्याची गरज नाही, असे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी शिल्पा देशपांडे यांनी आयएएस अधिकाऱ्यांना कळविले आहे.