मेळघाटात पाणी पेटले! विहिरींना कोरड, २० गावांना टँकरने पुरवठा; आदिवासींची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 07:30 AM2022-06-04T07:30:00+5:302022-06-04T07:30:02+5:30

Amravati News चिखलदरा तालुक्यातील खडीमलसह २० गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना आदिवासी करीत आहेत. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Water burns in Melghat, wells dry up, tanker supply to 20 villages, tribals flee | मेळघाटात पाणी पेटले! विहिरींना कोरड, २० गावांना टँकरने पुरवठा; आदिवासींची वणवण

मेळघाटात पाणी पेटले! विहिरींना कोरड, २० गावांना टँकरने पुरवठा; आदिवासींची वणवण

Next
ठळक मुद्देज्याची बादली पाण्याने भरली, तो नशीबवान!

नरेंद्र जावरे

अमरावती : त्यांची सकाळ पाण्याने नव्हे, तर पाण्याच्या प्रतीक्षेत जाते. चातकाप्रमाणे ते टँकरची वाट पाहतात. टँकर ओतला गेला की, संपूर्ण गाव धावत सुटते विहिरीकडे. दोरखंडाने बांधलेल्या शेकडो बादल्या एकाच वेळी विहिरीत पडतात. मात्र, ज्याची बादली पाण्याने भरली, तो नशीबवान. हे चित्र आहे मेळघाटातील खडीमल गावाचे. चिखलदरा तालुक्यातील खडीमलसह २० गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना आदिवासी करीत आहेत. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मेळघाटात २५ वर्षांपासून हीच अवस्था आहे. पाणीपातळी खालावल्याने लाखो रुपयांच्या योजना मृत पडल्या. टँकरशिवाय कुठलाच पर्याय नाही. नादुरुस्त वजा बेपत्ता रस्त्यांवरून पाणी पोहचवले जात आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच अनेक गावांच्या घशाला कोरड पडली.

२० गावांमध्ये टँकर

चिखलदरा तालुक्यातील आवागड, खंडुखेडा, खोंगडा, एकझिरा, गौलखेडा बाजार, धरमडोह, बहादरपूर, आकी, नागापूर, सोमवारखेडा, मोथा, आलाडोह, लवादा, बगदरी, तोरणवाडी, तारूबांदा, रायपूर, खडीमल आदी २० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

खडीमलची अवस्था सर्वांत भीषण

खडीमल या आठशे लोकवस्तीच्या पाड्याला तीन किलोमीटर अंतरावरील नवलगाव येथील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. वीज नसल्याने सौरऊर्जा पंपावर दोन टँकर भरला जाईल एवढेच पाणी निघते. हे पाणी विहिरीत टाकल्यावर आदिवासी बादलीने ओढून नेतात. रस्ताच अत्यंत खराब असल्याने प्रशासनाला दुसरा टँकर लावता आला नाही. नजीकच्या नदी-नाल्यात झिरे खोदून पाण्याचा शोध घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात.

मेळघाट तहानलेले, पाणी जाते अन्य तालुक्यांना

मेळघाटात पायथ्याशी असलेल्या शहानूर धरणातून अंजनगाव, दर्यापूर तालुक्यांना, चंद्रभागा धरणावरून अचलपूर, परतवाडा शहर, तर सापन प्रकल्पातून चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील ८५ गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र, पाणी देणाऱ्या तालुक्यातील आदिवासींची भटकंती होत आहे.

हातपंप कोरडे

आदिवासी पाड्यांमध्ये दीडशेवर हातपंप पाणी खोलवर केल्याने कोरडे पडले आहे. चारशेच्या जवळपास हातपंप परिसरात आहेत.

 

२० गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खडीमल येथे अतिरिक्त टँकरने पुरवठा होणार आहे. वीजपुरवठा नसल्याने टँकर भरला जात नाही. रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर उपाय काढले जात आहे.

- जयंत बाबरे, गटविकास अधिकारी, चिखलदरा

Web Title: Water burns in Melghat, wells dry up, tanker supply to 20 villages, tribals flee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.