वरूड तालुक्यात जलसंकट गहीरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:23 PM2018-05-22T22:23:33+5:302018-05-22T22:23:33+5:30
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ वरूड तालुक्यात जलसंकटाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. तालुक्यातील नऊ प्रकल्पांपैकी केवळ वाईमध्ये २६.२६ टक्के आणि सातनूरमध्ये १३.७० टक्के पाणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ वरूड तालुक्यात जलसंकटाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. तालुक्यातील नऊ प्रकल्पांपैकी केवळ वाईमध्ये २६.२६ टक्के आणि सातनूरमध्ये १३.७० टक्के पाणी आहे. तीन प्रकल्प पूर्णत: कोरडे झाले आहेत. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यात जलव्यवस्थापन आणि पाण्याच्या बचतीबाबत जनजागृती करण्यात येत असून, पाणी वाचविणे ही काळाची गरज झाली आहे.
वरूड तालुका अतिशोषित झाल्याने भूजल पातळी १२०० फुटांच्या खाली गेल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाकरिता दुर्भिक्ष जाणवते. यामुळे वरूडसह मोर्शी असे दोन्ही तालुके १९९४ पासून ड्रायझोन घोषित करण्यात आले आहेत. अतिशोषित भूभाग घोषित झाल्याने तालुक्यात नवीन विहिरी आणि बोअर करण्यावर शासनाची बंदी आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आठ दिवसांत ८० टक्के विहिरी उचक्या देऊ लागल्याने संत्रापिकाच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात २३ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली असून, यापैकी २१ हजार हेक्टर जमिनीवर फळधारणा करणारी संत्राझाडे आहेत.
पूर्वी राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल मिशनच्यावतीने राष्ट्रीय पेयजल सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आले. या प्रकल्पात अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्याची निवड करण्यात आली होती. प्रकल्पासाठी गावागावांत सभा घेण्याकरिता सहयोग युथ वेलफेअर सोसायटी ही एनजीओ नेमली होती. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुरक्षा आणि स्वच्छतेचा मूलमंत्र देण्यासाठी गावातील पायाभूत माहितीचे संकलन, वॉर्डनिहाय गटचर्चा, महिलांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगण्याकरिता ग्रामस्थांच्या सभेचे आयोजन करून गावाचे नकाशे काढून इत्थंभूत बाबींचा समावेश त्यात करण्यात आला होता. गतवर्षीपासून पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा सुरू करून ५८ गावांमध्ये जनजागृती करण्यात आली.
रेन वॉटर हार्वेस्टिंग ठरले कुचकामी !
शासनाने पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम राबविली. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयावर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रयोगावर लाखो रुपये खर्च केले. परंतु, हा प्रयोग कुचकामी ठरला. रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे सर्व साहित्य पडीक ठरले आहे. याकरिता मिळणारे शासनाचे अनुदान पाण्यात गेले.
वरूड तालुका अतिविकसित क्षेत्र असल्याने उपसा मोठ्या प्रमाणावर आहे. पावसाचे पडणारे पाणी, भूगर्भात जिरणारे पाणी आणि उपसा होणारे पाणी यामध्ये समतोल साधला जाणार नाही, तोपर्यंत ‘अतिशोषित’चा शिक्का कायम राहील.
- डी.एम. सोनारे,
शाखा अभियंता, शेकदरी सिंचन विभाग