गाव आराखड्याप्रमाणे जलसंवर्धनाची कामे
By admin | Published: March 21, 2016 12:22 AM2016-03-21T00:22:09+5:302016-03-21T00:22:09+5:30
तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यात खरीप हंगामासाठी पाण्याची गरज शेतकऱ्याला भासणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : नेरपिंगळाईतील शेततळे, चिखलसावंगीत नाला खोलीकरण
मोर्शी : तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यात खरीप हंगामासाठी पाण्याची गरज शेतकऱ्याला भासणार आहे. त्यामुळे गाव आराखड्याप्रमाणे मंजूर १०० टक्के जलसंवर्धनाची कामे पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिले.
नेरपिंगळाई गावास भेट देऊन तेथे जलयुक्त शिवारामध्ये सुरू असलेल्या शेततळ्याची, जलजागृती सप्ताहानिमित्त पाण्याचे महत्त्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय मुळे, सरपंच भोपळे, तालुका कृषी अधिकारी डोंगरे, मंडळ कृषी अधिकारी ढोमणे, कृषी सहायक गुडधे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संजय मनगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
नेरपिंगळाई मंडळामध्ये जलयुक्त शिवाराच्या १०७ पैकी ३४ कामे पूर्ण झालीत. चारपैकी एक शेततळ्याचे काम पूर्ण झाले. ही आकडेवारी तोकडी आहे. त्यामुळे उर्वरित शेततळे व जलयुक्त शिवारातील कामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मोर्शी तालुका हा डार्क झोनमध्ये येतो. नेरपिंगळाईमध्ये बराच भाग हा सिंचनाचा आहे. त्यामुळे मागेल त्याला शेततळे या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यामध्ये ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहेत, अशा चार-पाच शेतकऱ्यांनी समूहाने शेततळे तयार करा व त्याचा फायदा घ्या. आपल्या भागात सुरू असलेले जलयुक्त शिवारामधील कामांची माहिती वारंवार तालुका कृषी अधिकाऱ्यांपासून घेत रहा. जलयुक्त शिवार जर पूर्णपणे यशस्वी करायचा असेल तर त्यात गावकऱ्यांचाही सहभाग असणे आवश्यक आहे. नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, शेततळे यामुळे येथील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल. जलसंवर्धन जर चांगल्याप्रकारे झाले तर मोर्शी डार्क झोन म्हणुन ओळखल्या जाणार नाही. शेततळ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठा निर्माण होतो. त्यामुळे शेतीला पावसाचे पाणी मिळाले नाही तरी पिकांसाठी पाण्याची टंचाई भासत नाही, असे सांगून त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 'मागेल त्याला शेततळे' या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जलजागृती सप्ताह १६ ते २२ मार्चपर्यंत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचायत नेरपिंगळाई येथे उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना त्यांनी जलप्रतिज्ञा देऊन याचा योग्य उपयोग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
नाला खोलीकरणाची पाहणी
मोर्शी तालुक्यातील चिखल सावंगी येथे सुरू असलेल्या नाला खोलीकरणाची पाहणी यावेळी जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी केली. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवारातील उर्वरित सर्व कामे येत्या १० दिवसांत सुरू करुन तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.