शहरातील पाणीप्रश्न पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:41 PM2018-05-19T22:41:17+5:302018-05-19T22:41:17+5:30
मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजीप्रा प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजीप्रा प्रशासन सुरळीत पाणीपुरवठ्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.
उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. शहरातही पाणी पुरवठ्याची गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. अमृत योजनेची कामे पूर्ण झाल्यावर शहरात सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही मजीप्राने दिली. मात्र, अमृत योजनेची ६० टक्के कामे अद्यापही शिल्लक असल्यामुळे सद्यस्थितीत तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे चिन्हे नाहीत. मजीप्राकडे ९० हजार ५० ग्राहकांची संख्या असून, या सर्व ग्राहकांना १६ पाणी टाक्यावरून सद्यस्थितीत दररोज ११२ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सद्यस्थितीत विहिरी व बोअरवेल आटल्यामुळे मजीप्राकडे पाण्याची मागणी दुपटीने वाढल्यामुळे ग्राहकांना नियमित पाणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मजीप्राकडून खालच्या भागात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, उंच ठिकाणी पाणीटंचाईची झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे. बडनेरात एकाच जुन्या टाकीवर पाणीपुरवठ्याची मदार असल्यामुळे तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गोपालनगर, मराठा कॉलनी, शहरालगतच्या काही भागांमध्ये पाणीप्रश्न पेटला आहे.
अमृतमधील कामांच्या दिरंगाईमुळे कलह
अमृत योजनेतील ६० टक्के कामे अजूनही अपूर्ण असून, ती कामे संथगतीने सुरू आहेत. पाइप लाइन टाकणे, नळ जोडणी करणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या उंच टाक्यासह अन्य अनेक कामे रखडलेली असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.
पाणी मिळत नाही
मासोद येथील जलशुद्धीकरण केंद्राची ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची मर्यादा आहे. मात्र, सद्यस्थितीत ११२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जात आहे. मर्यादेपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असताना मागणीही दुपटीने वाढली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची मागणी पाहता, ग्राहकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड सुरु झाली आहे.
राधानगरातील पाईपलाईन फुटली
अमरावती : राधानगरातील गल्ली क्रमांक २ मध्ये सिमेंट रस्त्यावरील पाईपलाईन फुटल्यामुळे या भागात नळ येतात तेव्हा हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो. गेल्या आठ दिवसांपासून नागरिक हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून, या ठिकाणी काही नागरिकांनी मजीप्राकडे तक्रारी केल्यानंतरही याची दखल घेण्यात आलेली नाही. गेल्या आठ दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत असून, रस्त्याने पाणी वाहत आहे. एकीकडे एक दिवसआड पाणीपुरवठा, तर दुसरीकडे असा अपव्यय सुरू आहे. संबधित अभियंत्यांनी या भागाची पाहणी करून समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.
शंकरनगरातील विहिरींची पातळी गेली खोल
अमरावती : शंकरनगरातील सार्वजनिक व घरगुती विहिरींची पातळी खोल गेली असून, यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या ठिकाणी मजीप्राच्या नळाला एक दिवसाआड अवेळी व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. शंकरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विहिरीवरून अंदाजे १०० च्या वर कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या ठिकाणी राजापेठ उड्डाणपुलाच्या कामासाठी एका कंपनीने स्मशानभूमीलगत खुल्या भूखंडावर चार ते पाच बोअरवेल केल्या आहेत. हजारो लिटर पाण्याचा उपसा केल्यामुळे भूजल पातळी खोल गेली असल्याने परिसरातील बहुतांश खासगी विहिरी आटल्या आहेत.
विहिरी व बोअरवेल आटल्याने मजीप्राच्या पाण्याचा वापर अधिक वाढला आहे. पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे मोठा ताण वाढला आहे. पाऊस पडल्यानंतर मागणी कमी होईल. त्यानंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- किशोर रघुवंशी,
उपविभागीय अभियंता, मजीप्रा