अडीचशे फुटांवरही सापडेना पाण्याचा थेंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:50 PM2018-05-15T22:50:34+5:302018-05-15T22:51:15+5:30

एकीकडे पावसाचे कमी होणारे प्रमाण, तर दुसरीकडे नागरिकांनी बोअर घेण्याचा बेसुमार सपाटा लावल्याने शहर व परिसरातील जमिनीची चाळणी झाली आहे. यंदा बुधवारा परिसरातील शंभर वर्षे जुन्या विहिरींनी तळ गाठला असताना शहरातील १०० पेक्षा अधिक बोअर कोरड्याठण्ण पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहेत.

Water drop on two and a half feet | अडीचशे फुटांवरही सापडेना पाण्याचा थेंब

अडीचशे फुटांवरही सापडेना पाण्याचा थेंब

Next
ठळक मुद्देबोअर कोरड्या : शाळा, उद्यानांना फटका

प्रदीप भाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकीकडे पावसाचे कमी होणारे प्रमाण, तर दुसरीकडे नागरिकांनी बोअर घेण्याचा बेसुमार सपाटा लावल्याने शहर व परिसरातील जमिनीची चाळणी झाली आहे. यंदा बुधवारा परिसरातील शंभर वर्षे जुन्या विहिरींनी तळ गाठला असताना शहरातील १०० पेक्षा अधिक बोअर कोरड्याठण्ण पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहेत. महापालिका प्रशासनाने या टंचाईला दुजोरा दिला आहे. अडीचशे फूट खोल खोदूनही बोअरला पाणी लागत नसल्याचे वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे.
महापालिकांच्या शाळांसह उद्यान व सार्वजनिक स्वच्छतागृहांतील बोअर कोरडे पडल्याने चिंतेचा सूर उमटला आहे. शहरातील अनेक ठिकाणची बोअर आटल्याने उद्यान विकास व सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तब्बल २५० फूट खोदूनही पाण्याचा थेंब मिळत नसल्याने जमिनीत आणखी खोल छिद्रे पाडण्याची अहमहमिका लागली आहे. भूगर्भातील पाण्याचा अनिर्बंध उपसा होत असल्याने ही परिस्थिती ओढविली आहे.
प्लॉट, घर घेतले की अगोदर सर्रास बोअर घेतले जाते. बोअर कुठे , केव्हा, कधी घ्यावे, यासाठी कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने मागील आठ ते दहा वर्षांत बोअर घेणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली. जमिनीत पाणीच नसल्याने अनेक भागात २०० फुटांवरसुद्धा धुराळाच बाहेर येत आहे. किमान पिणे आणि वापरण्यासाठी पाणी हवे असेल तर २०० ते ३०० फुटांपेक्षा जास्त खोल बोअर घ्यावा लागतो. तर काही भागात ३०० फुटांपर्यंतही पाण्याचा थेंब सापडेनासा झाला आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी शहरातील अनेक भागांत शंभर फुटांवर पाणी लागत होते. मात्र, ती खोली आता ३०० फुटांपर्यंत गेली आहे. शहरात हातपंप देणे बंद असल्याने त्याजागी बोअर घेऊन विद्युत मोटार बसविण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याने भूजल पातळी आणखी खोल जाऊ लागली आहे.
उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर यांच्या माहितीनुसार, कस्तुरबाग आणि टॉवर लाईनसह मेहेरबाबा कॉलनी, व्यंकटेश कॉलनी येथील उद्यानातील बोअर आटल्या आहेत. तर म्हाडा कॉलनी, दस्तुरनगर मसानगंज येथील उद्यानातही पाणी नाही. त्यामुळे अनेक उद्यानांतील बोअरमधून अल्प प्रमाणात पाणी उपसा होत आहे.
सांडपाण्याचा प्रश्न
जयस्तंभ व गांधी चौकात महापालिका व खासगी संस्थांद्वारे पे अ‍ॅन्ड युज स्वच्छतागृहे चालविली जातात. या दोन्ही ठिकाणची बोअर महिनाभरापूर्वी कोरडे पडले. गांधी चौकात दोन दिवसांपूर्वी पुन्हा बोअर करण्यात आले. तेव्हा २२५ फुटांवर पाणी लागले. तसेच जयस्तंभ चौकस्थित बोअरला पाणी लागत नसल्याने तेथे टाउनहॉलमधून पाणीपुरवठा केला जात आहे. बोअर कोरड्या पडल्याने तेथील प्रसाधनगृहांसाठी लागणाºया पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाण्याचा वापर वाढल्याने भूजल पातळी कमी होत आहे. विहिरी पावसाळ्यानंतर लवकर कोरड्या पडतात. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविली पाहिजे. यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या दृष्टीने विहिरींची व बोअरवेलचे पुनर्भरण करण्याची सध्या गरज आहे.
- एस. डब्ल्यू. कराड,
वरिष्ठ भू-वैज्ञानिक (जीएसडीए)

जयस्तंभ व गांधी चौकस्थित स्वच्छतागृहांना पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही बोअरवेल यंदा पहिल्यांदाच कोरड्या पडल्या. गांधी चौकात तब्बल २२५ फूट खोदल्यानंतर बोअरला पाणी लागले. याशिवाय शहरातील बऱ्याच उद्यानातील बोअरवेल कोरड्या पडल्या.
- नरेंद्र वानखडे,
उपायुक्त, महापालिका

Web Title: Water drop on two and a half feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.