कांद्याच्या कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By admin | Published: May 6, 2016 12:14 AM2016-05-06T00:14:43+5:302016-05-06T00:14:43+5:30
अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, करजगाव, सिरजगाव, परसापूर, रामापूर, कासमपूर, अंजनगाव सुर्जी, पांढरी खानमपूर आदी गावांत पूर्वीपासून पांढऱ्या कांद्याचे पीक घेण्यात येते.
चार रुपये किलो दर : अवकाळी पावसाचा फटका
पथ्रोट : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, करजगाव, सिरजगाव, परसापूर, रामापूर, कासमपूर, अंजनगाव सुर्जी, पांढरी खानमपूर आदी गावांत पूर्वीपासून पांढऱ्या कांद्याचे पीक घेण्यात येते. त्यामुळे या परिसरात कांद्याचे विक्रमी पीक घेण्याकरिता शेतकऱ्यामध्ये स्पर्धा लागत होती. कांद्याचे उत्पादन होवो अथवा न होवो काही शेतकरी पूर्वीपासून कांद्याचे पीक वर्षानुवर्षे घेत आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी शेतकरी या परिसरात एकरी १०० ते ११० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेत होते. तेवढ्या पिकावर शेतकऱ्याचा कांदा पिकाला लागलेला खर्च निघून नफा मिळत होता. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. मात्र मागील वर्षापासून शेतकऱ्याला लागलेला खर्च निघत नसून तोटा येत आहे. त्याचे मुख्य कारण असे की, नैसर्गिक आपत्ती, वाढते रासायनिक खताचे दर, वाढती मजुरी, कांदा बियाचे वाढलेले दर व मुख्य कारण म्हणजे कांदा पिकाला कवडीमोल मिळणारा भाव आदी कारणे आहेत.
यावर्षी शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड करण्याकरिता १६०० ते १८०० रुपये पायली या भावाने कांद्याचे बियाणे विकत घेऊन सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात वाफे तयार करून बियाणे टाकून रोप तयार करीत असे. कांदे रोपाची लागवड करण्याकरिता शेताची मशागत करून शेणखत फेकणे, एकरी प्रत्येकी तीन-तीन पोते पोटॅश व सुपर फॉस्पेटची रासायनिक खते फेकणे, वाफे तयार करणे, डिसेंबर ते जानेवारी महिन्यात मोठे झालेल्या रोपाची वाफ्यात पाणी सोडून महिला मजुराकडून त्याचे रोपण (लागवड) केले जातात.
२०० रुपये प्रतिदिवस महिलेला मजुरी दिली जाते. पाणी देणाऱ्या पुरुष मजुराला २५० रुपये दर दिवसाला मजुरी, निंदण-खुरपण करणे, रासायनिक मिश्र खताची कांदा मोठा होईपर्यंत तीन वेळा मात्रा देणे, तीन ते चार वेळा रोग निर्मूलनाकरिता फवारणी केली जाते. कांदा पीक मोठे झाल्यानंतर उपडण्याचा खर्च, कापणीचा खर्च असा एकूण शेतकऱ्याला ४० हजार रुपये एकरी खर्च येतो. यावर्षी काही शेतकरी व मजूर वर्गानी मोठ्या शेतकऱ्यांकडून ३० ते ३२ क्विंटल एकराप्रमाणे कांदा पिकाकरिता शेती लागवडीने केली. मात्र त्यांना ठरल्याप्रमाणे मूळ मालकाला ३० ते ३२ क्विंटल कांदा द्यावा लागला परिणाम केलेल्या खर्चातून त्यांना लागलेला खर्च तर निघणे कठीण उलट तोटा आला. कांदा पीक घेण्याकरिता इतका खटाटोप करून शिल्लक न उरणे ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. उत्पादन खर्चाच्या मानाने शेतकऱ्याला एकरी १३० ते १४० क्विंटल कांदा व्हायला पाहिजे. तेव्हा शेतकऱ्यांना कांदा पीक घेणे परवडेल.
यावर्षी उत्पादित झालेल्या नवी कांद्याला चार रुपये प्रतिकिलोप्रमाणे कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. (वार्ताहर)