दुष्काळात ‘जलदाह’! एप्रिलमध्ये स्थिती गंभीर

By admin | Published: April 12, 2016 12:06 AM2016-04-12T00:06:54+5:302016-04-12T00:06:54+5:30

विभागातील अन्य चार जिल्ह्यांच्या तुलनेत भीषणता नसली तरी जिल्ह्यात एप्रिलअखेर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.

'Water' in the famine! Critical status in April | दुष्काळात ‘जलदाह’! एप्रिलमध्ये स्थिती गंभीर

दुष्काळात ‘जलदाह’! एप्रिलमध्ये स्थिती गंभीर

Next

गावागावांत पायपीट : लघुप्र्रकल्प कोरडे, मजीप्राला मर्यादा
अमरावती : विभागातील अन्य चार जिल्ह्यांच्या तुलनेत भीषणता नसली तरी जिल्ह्यात एप्रिलअखेर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळला असताना दुष्काळात तेरावा महिना म्हणून जिल्ह्यातील जलसंकटही गडद होऊ लागले आहे. पारा ४३-४४ डिग्री सेल्सियसच्या घरात असताना भर उन्हात हजारो नागरिकांना पायपीट करीत ‘जलदाह’ सोसावा लागत आहे.
मागील महिन्यात राज्य शासनाने जिल्ह्यातील १९६७ गावांत टंचाई जाहीर केली. तद्वतच उपाययोजनाही जाहीर केल्यात. तथापि यातील अनेक उपाययोजना कागदावरच राहिल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील जलसंकट तीव्र होण्याचे दु:चिन्ह आहे. उन्हाच्या झळा जसजशा तीव्र होतील तसातशी सिंचनप्रकल्पातील जलसाठ्यात घसरण होत जाईल व जलसंकटात भर पडेल, असे सध्याचे चित्र आहे. गेल्या ५ -६ वर्षापासून सततची नापिकी, अत्यल्प पाऊस आणि भरीसभर कोसळणारे सुलतानी संकट यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. बहुतांश ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी मैलाचे अंतर गाठावे लागते.

चिखलदऱ्याला फटका
अमरावती : चिखलदरा तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भयाण होत आहे. तलाव कोरडे पडल्याने मे महिन्यात अधिक भयावह स्थिति होणार आहे. तूर्तास तालक्यातील खडिमल, पाचडोंगरी, कोयलारी, मोथाखेडा, आवागड, तारुबांधा, कुलंगणा, भांद्री, ढोमणबर्डा, कालपाणी व पस्तलाई या गावात शासकीय टॅँकरने पेयजलचा पुरवठा होत आहे.
लघुप्रकल्पांमध्ये लघुत्तम जलसाठा असल्याने एप्रिलच्या शेवटी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठे जलसंकट उदभवणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सूचना
तहसीलदार, तलाठ्यांनी सतर्क राहावे, टॅँकर फेऱ्यांच्या नोंदी ठेवाव्यात., ग्रामपातळीवर बैठका घेऊन आढावा घ्यावा., पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, टंचाईची स्थिति लक्षात घेता अधिकचे नियोजन करावे, पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी, टंचाईग्रस्त गावांत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी.
१० कोटींचा आराखडा तरीही पायपीट
अमरावती जिल्हापरिषदेने सुमारे ७०८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी विविध उपाययोजनांचा सुमारे १० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यात सिंचनविहिरी, नळयाजेना, कुपनलिका, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, टॅँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा, विहिरी अधिग्रहित करणे या उपाययोजनांचा समावेश आहे. तथापि अनेक गावात गावकऱ्यांची पेयजलासाठी पायपीट सुरु आहे.

शहरातही केवळ दोन तास पाणीपुरवठा
जिल्ह्यात सर्वदूर पाणीटंचाई जाणवत असताना अप्पर वर्धातील जलसाठ्यात झालेली घसरण पाहता शहरवासियांना मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत. मजीप्राकडून तुर्तास केवळ दोन तास पाणी पुरवठा केला जातो. त्याही पाण्याचा दाब कमी असल्याने पेयजलाची साठवण होत नाही. महापालिकाक्षेत्रात मजीप्राच्या ग्राहक संख्येच्या तुलनेत ग्राहकांना १२० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असताना अनेक भागात पेयजल पोहोचत नाही.

मे महिन्यात स्थिती गंभीर
एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाने ४३ अंशाचा आकडा गाठल्यामुळे चैत्र, वैशाखात पाणीटंचाईची दाहकता वाढणार आहे. तुर्तास चिखलदरा तालुक्यातच टॅँकरने पाणीपुरवठा होत असला तरी एप्रिलच्या शेवटी व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टॅँकर्सची संख्या वाढणार आहे.

Web Title: 'Water' in the famine! Critical status in April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.