पहिल्याच पावसात शहरात तुंबले पाणी!

By admin | Published: June 20, 2015 12:38 AM2015-06-20T00:38:26+5:302015-06-20T00:38:26+5:30

गुरूवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले.

Water in the first rain in the city! | पहिल्याच पावसात शहरात तुंबले पाणी!

पहिल्याच पावसात शहरात तुंबले पाणी!

Next

आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा : भुयारी गटारातील पाणी लोकांच्या घरात, नागरिकांची प्रचंड त्रेधा
अमरावती : गुरूवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले. मात्र, सायंकाळी पुन्हा आकाशात ढगांची गर्दी झाली आणि दोन तासपर्यंत धो-धो पाऊस बरसला. पावसाळ्यातील हा पहिलाच दखलपात्र पाऊस होता, असे म्हणण्यास हरकत नाही. या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा पार बोजवारा उडाल्याचे चित्र होते.
पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांचे दैनंदिन उपयोगाच्या वस्तुंचे नुकसान झाले. कित्येकांना रात्रभर घरात तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली. फरशी स्टॉप, धनश्री कॉलनी परिसरात पावसाचे पाणी घरात शिरल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी नगरसेवक राजू महल्ले यांच्याकडे केल्या. शेवटी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने घराशेजारी नाल्या खोदून पाणी बाहेर काढले. शहरातील विविध भागांत अशीच काहीशी परिस्थिती होती.
माजी महापौैर वंदना कंगाले यांच्या प्रभागातील आदर्श कॉलनीतही अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. शंकरनगर प्रभागात पावसामुळे एक वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. हे झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला. तर प्रशांतनगरात फ्लॅटची संरक्षण भिंत कोसळल्याने गोंधळ उडाला. ही भिंत आसपासच्या नाल्यांमध्ये कोसळल्याने नाल्या अवरूध्द झाल्या. परिणामी पाणी रस्त्यांवरून वाहू लागले.
दरवर्षीच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कुचकामी ठरते. संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना असूनही समतोल साधता येत नाही. नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी झाल्यास तसेच ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्यवेळी लावल्यास अशी परिस्थिती उद्भवण्याचा धोका कमी होतो. मात्र, सफाई कंत्राटदारांची मनमानी आणि महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदैव साफसफाईचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. याचाच परिणाम यंदा पुन्हा एकदा जाणवला आहे. याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Water in the first rain in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.