५०२ प्रकल्पांचा पाणीसाठा सरासरी ८० टक्क्यांवर स्थिरावला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 06:55 PM2019-10-09T18:55:41+5:302019-10-09T19:24:35+5:30
यंदा मान्सूनचा पाऊस ३० सप्टेंबर रोजी संपला आहे. पावसाळा जरी संपला असला तरी अकाली पावसाची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अकाली पावसाने प्रकल्पातील पाणीसाठा फारसा वाढण्याची शक्यता नाही.
संदीप मानकर
अमरावती - यंदा मान्सूनचा पाऊस ३० सप्टेंबर रोजी संपला आहे. पावसाळा जरी संपला असला तरी अकाली पावसाची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अकाली पावसाने प्रकल्पातील पाणीसाठा फारसा वाढण्याची शक्यता नाही. त्याकारणाने लघु, मध्यम व मोठ्या अशा एकूण ५०२ प्रकल्पांचा पाणीसाठा सरासरी ८० टक्क्यांवर स्थिरावला आहे.
विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ८३.८६ टक्के आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ९०.३३ टक्के पाणीसाठा आहे. ४७३ लघु प्रकल्पांत ६९.८१ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, यापुढे पाणीसाठा वाढण्याची शक्यता नसल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. अद्यापही सात प्रकल्पांची दारे उघडीच आहेत. पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून, किमान पाच ते दोन सेंमीपर्यंत अद्याप अनेक प्रकल्पांचे गेट उघडेच आहेत.
मोठ्या प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरला. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प ६९.८० टक्के, अरुणावती १५.८८ टक्के, बेंबळा १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ५९.५४ टक्के, वान प्रकल्प १०० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ७१.३६ टक्के, पेनटाकळी १०० टक्के, खडकपूर्णा ९९.७ टक्के पाणीसाठा साचला आहे. यामध्ये उर्ध्व वर्धा, बेंबळा, वान व पेनटाकळी प्रकल्पांचे अद्यापही गेट उघडेच आहेत. त्यातून नदीपात्रात पाणीसाठा होत आहे. मात्र, विसर्गाचे प्रमाण घमी प्रतिसेकंदानें कमी करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
२४ मध्यम प्रकल्पांची स्थिती
अमरावती जिल्ह्यतील शहानूर मध्यम प्रकल्पात ९९.३७ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा ९९.२२ टक्के, पूर्णा ९६.२७ टक्के, सपन १०० टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस १०० टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५८.२८ टक्के, वाघाडी ९५.५३ टक्के, बोरगाव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ७२.५५ टक्के, उमा ६२.६७ टक्के, घुंगशी बॅरेज ९०.३३ टक्के, अडाण ८४.१९ टक्के, वाशीम जिल्ह्यातील सोनल ८८.१८ टक्के, एकबुर्जी ७६.२७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोेराडी ३३.२० टक्के, मन ९६.९३ टक्के तोरणा १०० टक्के, उतावळी १०० टक्के पाणीसाठा साचला आहे. त्याकारणाने आणखीन पाणी वाढण्याची शक्यता कमी आहे. पण परतीच्या किंवा अकाली पावसाने काही प्रमाणात पाणीसाठा वाढू शकते, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
तीन मध्यम प्रकल्पांची अद्यापही द्वारे उघडीच
अमरावती जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांचे गेट अद्यापही उघडेच आहेत. ९ ऑक्टोबर सकाळी सात पर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पाचे एक गेट २.५ सेंमीने उघडे आहे. ३ घमी प्रतिसकंदाने विसर्ग होत आहे. चंद्रभागा प्रकल्पाचे दोन गेट उघडे आहे. पाच सेंमीने ९.०० घमी प्रतिसेकंदाने विसर्ग होत आहे. सपन प्रकल्पाचे दोन गेट तीन सेंमीने उघडे असून ५.४८ घमीप्रसेकंदाने विसर्ग होत आहे.