दुर्गम गावांमध्ये जल जीवन मिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 05:00 AM2021-04-20T05:00:00+5:302021-04-20T05:00:48+5:30

चिखलदरा तालुक्यातील जेतादेही येथे भेट देऊन पालकमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. ‘मनरेगा’च्या माध्यमातून गावांत विविध विकासकामे, अंगणवाडी, शाळा सुधारणेच्या कामांना चालना मिळाली आहे. मनरेगाशी विविध विकासकामांची सांगड घालून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ योजना राबविण्यात येत आहे. धारणी तालुक्यातील मांगिया येथे भेट देऊन पुनर्वसन झालेल्या कुटुंबांच्या अडचणी जाणून घेतल्या. मेळघाटात पाणी समस्या सोडविण्यासाठी जलजीवन मिशन हे उपयोगी ठरेल.

Water life missions in remote villages | दुर्गम गावांमध्ये जल जीवन मिशन

दुर्गम गावांमध्ये जल जीवन मिशन

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे यंत्रणेला निर्देश, मेळघाटातील विकासकामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती  : मेळघाटातील दुर्गम गावात पेयजलाच्या उपलब्धतेसाठी जल जीवन मिशनच्या कामांना गती द्यावी, तसेच आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील यंत्रणेला सोमवारी दिले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात कुठलीही कुचराई न करता नागरिकांना परिपूर्ण सुविधा उपलब्ध कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
ना. ठाकूर यांनी मेळघाटातील दुर्गम गावांत सलग दोन दिवस गोपनीय दौरा करून तेथील विकासकामांचा व सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गावोगावच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे आदेश प्रशासनाला दिले. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्यासह वनाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. 
चिखलदरा तालुक्यातील जेतादेही येथे भेट देऊन पालकमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. ‘मनरेगा’च्या माध्यमातून गावांत विविध विकासकामे, अंगणवाडी, शाळा सुधारणेच्या कामांना चालना मिळाली आहे. मनरेगाशी विविध विकासकामांची सांगड घालून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ योजना राबविण्यात येत आहे. धारणी तालुक्यातील मांगिया येथे भेट देऊन पुनर्वसन झालेल्या कुटुंबांच्या अडचणी जाणून घेतल्या. मेळघाटात पाणी समस्या सोडविण्यासाठी जलजीवन मिशन हे उपयोगी ठरेल. प्रत्येक गावात पाणी पोहचविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.  
दरम्यान, वनविभागातील विविध कामांचा आढावा घेताना वन्यजिवांची सुरक्षितता जोपण्यासाठी प्राधान्य दिले आहे. मनरेगा अंतर्गत आदिवासी बांधवांना हक्काचे काम मिळावे, कोणाचीही तक्रार येता कामा नये, अशी तंबी त्यांनी दिली. 

स्कायवॉकमुळे पर्यटनाला मिळेल चालना 
चिखलदरा येथे सिडकोव्दारे स्काय वॉकचे काम चालू आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा. प्रकल्पामुळे चिखलदऱ्यातील पर्यटनाला गती मिळेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तेथील वनविभागाच्या बागेला भेट देऊन विविध वनस्पती तसेच वन्यजीवांविषयी माहिती घेतली तसेच त्यांनी स्पायडर म्युझियमलाही भेट दिली. म्युझियमच्या विकासासाठी आवश्यक बाबी मिळवून देण्यात येतील, असेही सांगितले. 

मधुमक्षिका पालनातून रोजगारनिर्मिती 
शहापूरच्या शिवस्फूर्ती प्रोसेसिंग फाऊंडेशनव्दारे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहे. या केंद्राद्वारे आदिवासी महिलांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण मिळते. यातून स्थानिक महिलांना भक्कम रोजगाराचे साधन मिळण्यासाठी आवश्यक ती मदत शासनाकडून मिळवून दिली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

आहारासंदर्भात जनजागृती करा    
त्यांनी मोथा येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राला भेट दिली. स्थानिकांमध्ये हिमोग्लोबीन कमतरतेची समस्या आढळून येत असल्याने आहारासंबंधी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तेथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन त्यांनी कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. मोथा येथील रोहयोच्या कामांचा आढावा घेतला. सेमाडोह येथील पीएचसीला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली.

औषधी वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजाती जतन करा 
धारणी तालुक्यातील बारी येथे भेट देऊन पालकमंत्र्यांनी वन विभागाच्या रोपवाटिकेला, औषध व दुर्मीळ प्रजाती संवर्धन केंद्राला भेट देऊन तेथे लागवड केलेल्या औषधी वनस्पतींची माहिती जाणून घेतली. औषधी वनस्पती तसेच दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन करणे, ही काळाची गरज आहे. याकरिता शासन स्तरावरून आवश्यक ती सर्व मदत करण्याकरिता कटिबध्द असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

 

Web Title: Water life missions in remote villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.