थिलोरी गावात शिरले नाल्याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:25+5:302021-07-12T04:09:25+5:30
दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान दर्यापूर : तालुक्यात पंधरा दिवसांच्या दडीनंतर आठ दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गात ...
दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान
दर्यापूर : तालुक्यात पंधरा दिवसांच्या दडीनंतर आठ दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असतानाच रविवारी सकाळी ५ ते ६.३० या दीड तासात कोसळलेल्या अतिमुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला पूर आला. नदीजवळील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील थिलोरी या गावालगत असलेल्या नाल्याला पूर आल्याने पाणी गावामध्ये शिरले. यामुळे संपूर्ण गाव जलमय झाले होते.
नाल्याचे खोलीकरण योग्य पद्धतीने न झाल्याने गावात पाणी शिरल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. लेहेगाव येथील नाल्याचे पाणी रस्त्यालगत असलेल्या शेतांमध्ये घुसल्याने पाण्याने पाट वाहू लागले होते. शेतात दोन ते तीन फूट एवढ्या उंचीने पावसाचे पाणी वाहत होते. या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसुद्धा केली होती. या भागात शेतामध्ये शिरलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दर्यापूर शहरात व्यावसायिकांना या पावसाच्या पाण्याचा जबर फटका बसला. काही दुकानांमध्ये अक्षरशः पाणी शिरले असून, छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. शहरातील सांगळूदकर कॉम्प्लेक्स, मेहेर कॉम्प्लेक्स, अक्षय इलेक्ट्रॉनिक्स, ओम ऑटोमोबाईल्स, पॅथॉलॉजी लॅबचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.
--------------
पिकांना फटका
रविवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पेरणी केलेले मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी ही पिके वाहून गेली. पावसामुळे तालुक्यातील थिलोरी, गायवाडी, सासण, येवदा, लेहेगाव या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
------------
तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डॉ. योगेश देशमुख, तहसीलदार, दर्यापूर
-------------
रस्ता बंद बॉक्स येत आहे.
110721\img-20210711-wa0035.jpg
दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान..
थिलोरी गावात शिरले पुन्हा नाल्याचे पाणी...