रबीला पाणी द्या, अन्यथा कोर्टात जाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:37 PM2018-10-28T22:37:16+5:302018-10-28T22:38:01+5:30
यावर्षी रबी हंगामात हरभऱ्यासाठी अप्पर वर्धा धरणातून एकपाळी पाणी सोडण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पाणी सोडण्यात येणार असून, त्याचा लाभ दहा हजार हेक्टर क्षेत्रातील हरभरा उत्पादकांना होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यावर्षी रबी हंगामात हरभऱ्यासाठी अप्पर वर्धा धरणातून एकपाळी पाणी सोडण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पाणी सोडण्यात येणार असून, त्याचा लाभ दहा हजार हेक्टर क्षेत्रातील हरभरा उत्पादकांना होणार आहे. रबी हंगामासाठी दोन पाळ्यांमध्ये गव्हाला पाणी सोडावे, अशी सूचना आमदार वीरेंद्र जगताप यांनी केली आहे. अन्यथा याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ऊर्ध्व वर्धा समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सिंचन विभागाच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांना दिला.
प्रकल्पात अल्प जलसाठा असल्याने सिंचनाच्या पुरवठ्यात कपात करण्याचे जलसंपदा विभागाचे मत आहे. उपयोजनेसाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षेखाली २७ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर वर्धा लाभक्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी व सदस्यांचे जलसंपदा विभाग महापालिका नगरपरिषद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मात्र, पालकमंत्र्यांनी व्यस्ततेमुळे बैठक रद्द करून मुंबईहून परतल्यानंतर घेऊ, असे सुचविले होते. ऐनवेळी बोलविलेल्या बैठकीस आ. वीरेंद्र जगताप यांच्यासह माजी खासदार विजय मुडे उपस्थित होते. यावेळी वीरेंद्र जगताप यांनी रबी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र वर्धा धरणात पाणीसाठा नसल्याने ती मागणी पूर्ण करणे अशक्य असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगगितले. हरभऱ्यासाठी नोव्हेंबरअखेर एकपाळी पाणी सोडणार असल्याचे सांगितले. किमान दोन पाळ्या तरी पाणी सोडण्याची तजवीज करण्याची मागणी जगताप यांनी केली. यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी तशी शक्यता कमी आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रकल्पात सध्या स्थितीत २५८ दलघमी ४५ टक्के जलसाठा आहे. याच पाण्यावर महापालिकेसह, तीन नगर परिषद ग्रामीण पाणीपुरवठा अवलंबून आहे. उन्हाळ्यात कडक राहण्याचा अंदाज असून पुरेसा पाऊस न झाल्याने भूगर्भातील जलपातळी कमी होण्यासोबतच जलसाठा अल्प आहे. त्यामुळे रबी हंगामासाठी पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. दरम्यान आ. वीरेंद्र जगताप यांनी या बैठकीत संबंधित विभागाकडून पाणीसाठ्याची विस्तृत माहिती जाणून घेतली. त्यावर त्यांनी रबी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या २०० दलघमी साठ्यातून सिंचनासाठी पाणी द्यावे, असा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला. यामध्ये गहू, हरभरा पिकांना पाणी देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून याबाबत निर्णय घ्यावा. यावर निर्णय न घेतल्यास वेळप्रसंगी आपण न्यायालयात दाद मागू, असा इशाराही जलसंपदा विभागाला त्यांनी दिला आहे. परिणामी आता यावर प्रशासन काय निर्णय घेते त्यावरच रबी हंगामातील पाणी सोडण्याबाबत भवितव्य अवलंबून आहे.