२५ ठिकाणचे पाणीनमुने दूषित; आरोग्य विभागाने बजाविली नोटीस
By जितेंद्र दखने | Published: May 9, 2024 09:49 PM2024-05-09T21:49:15+5:302024-05-09T21:49:36+5:30
खबरदारीसाठी उपाययोजना करण्याचे ग्रामपंचायतींना निर्देश
अमरावती : वाढत्या तापमानासोबतच ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यातल्या त्यात दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबंधित गटविकास अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असतांना काही ठिकाणी जलस्त्रोताचे पाणी नमूने दूषित आले आहेत. असे असले तरी अद्याप जिल्ह्यात कुठेही साथरोगाचा प्रादुर्भाव नसल्याचा माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागात अतिसार, टायफाइडचे रुग्ण आढळून येत असतात, खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य विभागांतर्गत साथरोग विभागाकडून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचे पाणी नमुने तपासले जातात.
त्यानुसार मार्चमध्ये १४ तालुक्यांतील १ हजार ४९१ पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यापैकी २५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य आढळून आले आहे. दूषित जलस्रोतांमध्ये अतिरिक्त ब्लिचिंग पावडरच्या माध्यमातून ते पाणी पिण्यास योग्य केले जाते. गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांमध्ये नियमानुसार ब्लिचिंग पावडरचे प्रमाण असणे गरजेचे आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याने काही ठकाणी पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत.
११ टॅकरव्दारे पाणी पुरवठा
सद्यःस्थितीत जिल्ह्यात ११ टँकर सुरू असून त्या माध्यमातून नागरिकांची तहान भागविण्यात घेत आहे. खांदूरेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यात बेला, मोथा, धामकडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार येथे प्रत्येकी एक तर खडीमल येथे चार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्यापही झाली नसल्याने या गावांना टँकराद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी टँकरच्या दुषित पाण्यामुळेच चिखलदरा तालुक्यातील पाचङोंगरी,कोयलारी या गावांमध्ये साथजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सद्यःस्थितीत ११ टँकरच्या माध्यमातून गावांची तहान भागविली जात आहे.
तालुकानिहाय दूषित नमुन्यांची संख्या
अमरावती ६,अचलपूर ३, चांदूर रेल्वे ३, धामणगाव ३ ,तिवसा १ ,दर्यापूर१,वरूड ४, भातकुली ४