जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:40+5:302021-06-09T04:15:40+5:30
अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाहीतर वीजटंचाई, प्रशासनातील नियोजनाचा अभाव ...
अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाहीतर वीजटंचाई, प्रशासनातील नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर यामुळे भासत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील ६७ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. यापैकी १८ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जून महिना सुरू झाला तरी जिल्ह्यातील या गावांमध्ये पाण्याची समस्था कायम आहे.
जिल्ह्यातील ६७ गावांपैकी १८ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दोन वर्षांपूर्वी पावसाने दिलेला दगा आणि गत वर्षी दिलेला हात. यामुळे टंचाईग्रस्त विदर्भातील गावांत्या संख्येत मोठी भर पडली आहे. जिल्ह्याला पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानुर, मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा ही धरणे जिल्ह्याला वरदान ठरली आहेत. परंतु तरीही धारणी व चिखलदरा मेळघाटातील भागात तसेच मोर्शी तालुक्यातील काही भागात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही मोर्शी तालुक्यात सर्वात जास्त गावे टंचाईग्रस्त आहेत. सध्या पाणीटंचाई ज्या गावात निर्माण झाली त्या गावात टँकर किंवा विहीर अधिग्रहाणाव्दारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात जे १८ टँकर सुरू आहेत. त्यातील एकट्या चिखलदरा तालुक्यात १७ टँकर सुरू आहेत. तर चांदूर रेल्वे तालुक्यातील एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
बॉक्स
या गावांना टँकरने पाणीपुरवठा
चिखलदरा तालुक्यातील एकझिरा, लवादा, अलाडोह, आकी, मलकापूर, सोमवारखेडा, मोथा, धरमडोह, बहादरपूर, तारूबांदा, तोरणवाडी, बगदरी, सोनापूर, रायपूर, सावऱ्या, आवागढ, कोयलारी, पाचडोंगरी, आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
बॉक्स
तालुकानिहाय विहीर अधिग्रहण
अमरावती १३, नांदगाव खंडेश्र्वर २०, भातकुली १, तिवसा ३, मोर्शी १४, वरूड ४, चांदूर रेल्वे २०, अचलपूर १२, चिखलदरा २९, धामणगाव रेल्वे २ आदी तालुक्यातील गावांना ११८ विंधन विहीर आणि खासगी विहिरींव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.