पाणीटंचाई; उपाययोजना ८०० प्रस्ताावित, मंजूर फक्त ९६
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 22, 2023 05:54 PM2023-04-22T17:54:32+5:302023-04-22T17:55:15+5:30
नळ योजनेच्या दुरुस्तीचे एकही काम सुरु नाही
अमरावती : मार्चपश्चात उन्हाची दाहकता वाढल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी ८०० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात ९६ उपाययोजनांना मंजूरी मिळालेली आहे. त्यापैकी ४४ पुर्ण झाल्यात तर ४४ अद्यापही प्रगतीत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मे, जूनमध्ये पाणीटंचाईचे चटके बसणार आहे.
जिल्ह्यात मेळघाट वगळता उर्वरित तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झाले व पाणी पातळीत वाढ झाली. मात्र, मार्चमध्ये चांगलेच तापायला लागल्याने दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. याशिवाय काही भागात खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाद्वारा करण्यात आले.
यावर्षी नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीची १३५ कामे सुचविण्यात आलेली असतांना ५० कामे मंजूर आहेत. मात्र, एकाही कामाला सुरुवात झालेली नाही. तात्पूरत्या पुरक नळ योजनेची १० कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी चार कामांनाच मंजुरी मिळालेली आहे. एकही काम सुरु नाही. खासगी ४२९ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतांना पाच उपाययोजनेला मंजूरी मिळाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
तहान लागल्यावर खोदणार विहीर
पाणीटंचाईचा सामना करण्यास २०७ नवीन विंधन विहीर, कूपनलिका प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी ३५ ला मंजूरी मिळालेली आहे. यापैकी एकही काम सुरु झालेले नाही, त्यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा नागरिकांचा आरोप आहे.