साहेब आले विहीर भरली साहेब गेले अन् कोरडी पडली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:08 PM2024-05-14T13:08:58+5:302024-05-14T13:09:23+5:30
Amravati : भरउन्हात दुपारी तीन वाजता भरतात महिला विहिरीतून गढूळ पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटातील कुपोषणानंतर खडीमलचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देशपातळीवर पोहोचला. व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक नियमाने येथील पाणीपुरवठ्याच्या योजना निकामी ठरल्या असताना भर उन्हात दुपारी तीन वाजता आदिवासी महिलांना सर्व कामे चातकासारखी पिण्याच्या पाण्याची वाट पाहावी लागते.
जिल्हा प्रशासनातील साहेब आले आणि त्यादिवशी विहीर तुडुंब भरली. पाठ फिरवतात रिकामी पडल्याचा अनुभव गावकऱ्यांना आला असून गढूळ पाणी दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनही गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजता, कडक उन्हात एकीकडे सर्वजण कुलर पंखा एसीमध्ये झोपले असतात तर खडीमल येथे महिला, मुले विहिरीतून हंडाभर पाण्यासाठी दिवसभर राबत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे दावे फोल ठरल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राहुल येवले यांनी केला आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईची दाहकता वाढत असतांना शासन- प्रशासनाद्वारा गांर्भियाने घेतल्या जात नसल्यानेच पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याचा आरोप येथीळ आदिवासी बांधवांनी केला आहे.
साहेब आले विहीर भरली...
जिल्हा प्रशासनातील साहेबांनी चार दिवसांपूर्वी खडीमल गावात वस्तुस्थिती पाहण्यासाठी भेट दिली. त्याच दिवशी विहीर भरली होती. मात्र लगेच दुसऱ्या दिवसापासून विहीर कोरडी पडली. टैंकरने टाकलेले पाणी ही क्षणातच बेपत्ता होत असल्याने बुड लागलेल्या विहिरीतच बकठीण आदिवासी मनी काढत असल्याचे चित्र आहे.
शुद्ध नव्हे गढूळ पाणी....
येथून टँकरद्वारे विहिरीत टाकण्यात येणारे पाणी पूर्णतः गढूळ अशुद्ध आहे. परंतु तेथे शुद्ध पाणी दिले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला आहे वास्तव काही वेगळेच आहे, प्रत्येकजण पिण्यासाठी विहिरीचे गढूळ पाणी नेत आहे. १५ किमी अंतरावरून माडीझडप येथून दोन-तीन टँकरने पाणी आणले जात आहे.
माडीझडप येथून पाणी, सोलर बंद
खडीमल गावात माडी झडप या १५ किलोमीटर अंतरावरून सोलरद्वारे असलेल्या बोअरवेलमधून पाणी टँकरद्वारे आणल्या जाते परंतु ढगाळ वातावरणाने सोलर काम करीत नसल्यामुळे शनिवार, रविवार दोन दिवस पाण्यासाठी ताटकळत राहावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.