नांदगावात पाणी टंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:58 PM2017-11-17T23:58:57+5:302017-11-17T23:59:59+5:30
तालुक्यातील बेंबळा व साखळी या मोठ्या नद्या यंदा कोरड्या पडल्या आहेत.
संजय जेवडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील बेंबळा व साखळी या मोठ्या नद्या यंदा कोरड्या पडल्या आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत खळाळून वाहणाऱ्या या नद्यांची धार काही दिवसापूर्वीच बंद झाली आहे. नदीपात्रात फक्त खोलगट भागात पाण्याचे डबके तेवढे शिल्लक उरले आहेत.
गेल्या सात वर्षाच्या तुलनेत यंदा फक्त ५११ मि.मी. इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील गावागावांतून वाहणारे नाले तर कधीचेच कोरडे पडले. यंदा जानेवारीपासूनच काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मंगरुळ चव्हाळा येथील साखळी नदीवरील कोल्हापुरी बंधाºयाचे गेट बंद करण्यात आले होते. पण, नदीलाच पाणी नसल्याने तेथील बंधाऱ्यात पाणी अडून साठले नाही. गेल्या वर्षभरापासून अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू आहे. आताच येथे पाणी टंचाईची झळ गावकऱ्याना सोसावी लागत असल्याचे येथील ग्रामस्थ अतुल ठाकूर यांनी सांगितले.
तालुक्यात ६८ ग्रामपंचायती असून, गावांची संख्या १२९ आहे. गावोगावी आगामी काळात उग्र होऊ पाहणाऱ्या पाणीटंचाईशी सामना करण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्याची गरज आहे. शेतातील विहिरींची पाण्याची पातळी खालावत असल्याने फळबागा व रबी हंगाम धोक्यात आला आहे. प्रशासनाने वेळीच व्यवस्थापन न केल्यास आगामी काळात भीषण टंचाईचे सावट आहे.
परिसरातील सर्वांत मोठी नदी असलेली साखळी दोन महिन्यांपूर्वीच कोरडी पडली. गावाच्या शिवारातील नाला कोरडा ठणठणीत अहे, नदी-नाले कोरडे पडल्याने जनावरांना शिवारात कुठेही पाणी नाही. जानेवारीनंतर तीव्र पाणीटंचाईचे संकेत आताच स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
- रूपाली सुनील इंझळकर
सरपंच, सालोड
गावालगत वाहणारी जळू नदी कोरडी झाली आहे. डिसेंबरनंतरच पाणीटंचाई जाणवणार आहे, विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. शेतातील विहिरींना पाणी कमी असल्यामुळे यंदा रबीच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
- राजेंद्र सरोदे
माजी सरपंच, माहुली चोर