पाण्यासाठी वणवण... कंत्राटदाराची देयके थांबवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 03:53 PM2024-05-31T15:53:33+5:302024-05-31T15:54:26+5:30
चारगाव पाणीपुरवठा योजना: कंत्राटदाराची मनमर्जी, एमजीपीची चुप्पी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटात भीषण पाण्याची टंचाई सुरू असताना चिखलदरानजीक शहापूर, आलाडोह, मोथा व लवादा या चार गावांसाठी बागलिंगा प्रकल्पावरून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे काम वेळेवर पूर्ण न केल्याने संबंधित कंत्राटदाराची देयके थांबविण्याचे पत्र मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. संबंधित कामाचा चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
बागलिंगा प्रकल्पावरून ११ किलोमीटर अंतरावरील चिखलदरा नजीकच्या आलाडोह शहापूर मोथा व लवादा या चार गावांसाठी जवळपास २६ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ३१ मार्च २०२४ पूर्वी संबंधित पाणीपुरवठ्याचे काम करण्याचे आदेश होते. परंतु, शिव कन्स्ट्रक्शन (शिंगणापूर, जि. सातारा) या कंपनीने संबंधित काम वेळेत पूर्ण न केल्याने चारही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मेळघाटात भीषण पाण्याची टंचाई सुरू असताना संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रशासन व नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत असल्याच्या कारणावरून देयके अदा न करता संपूर्ण कामाची चौकशी व कारवाईची मागणी आ. पटेल यांनी केली आहे.
दरम्यान, पाण्याची मागणी सातत्याने वाढत असली तरी मेळघाटात नळावाटे शुद्ध पाण्याचा पुरवठा ठरलेल्या मुदतीत होत नाही. त्याला तांत्रिक अडचणी असतात की अन्य, हा संशोधनाचा विषय आहे.
दहा टक्के जादा दराने निविदा
संबंधित कामाच्या निविदा दहा टक्के जादा दराने मंजूर करण्यात आल्या आहेत. निविदेतील अटी व शर्तीनुसार काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करणे गरजेचे होते. शासनाला त्याचा आर्थिक भुर्दंड व बसण्यासोबत नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
आगाऊ रक्कम देऊनही दर्जा निकृष्ट
पाईप लाईन व टाक्यांचे काम निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. टाकी बांधकामात क्यूरिंग केले जात नसल्याने दर्जाहीन काम तपासणीची मागणी आहे. दुसरीकडे मोबिलायझेशन अॅडव्हान्स अडीच कोटींपेक्षा अधिक रक्कम दिल्यावरही वेळकाढू धोरणाचा आरोप होत आहे.
पाइप लाइनचे काम अद्यापही अर्धवटच आहे.
तक्रार प्राप्त झाली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या परवानगीमुळे कामाला उशिरा सुरुवात झाली. काम लवकर करण्याच्या सूचना कंत्राटदाराला देण्यात येत आहे. अॅडव्हान्स रकमेतून कपात सुरू आहे.
- अर्जुन भुमरे, उपविभागीय अभियंता, मजीप्रा अचलपूर