खासदारांच्या दत्तक गावात पाणीटंचाई
By admin | Published: June 13, 2017 12:09 AM2017-06-13T00:09:32+5:302017-06-13T00:09:32+5:30
सांसद आदर्श ग्रामअंतर्गत खा. आनंदराव अडसूळ यांच्या दत्तक ग्राम कळमखारमध्ये मागील दोन महिन्यांपासून वॉर्ड नं १ व ४ मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे.
प्रशासनाचे अपयश : महिलांची ग्रामपंचायतीवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : सांसद आदर्श ग्रामअंतर्गत खा. आनंदराव अडसूळ यांच्या दत्तक ग्राम कळमखारमध्ये मागील दोन महिन्यांपासून वॉर्ड नं १ व ४ मध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी गावातील महिला पहाटे ग्रामपंचायतवर धडकल्या.
गावात आधी पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. त्यावर मात करण्यासाठी दुसरी पाण्याची टाकी उभारण्यात आली. सध्या २ पिण्याच्या टाक्या गावात उभ्या आहेत. परंतु, त्यांतून फक्त काही वॉर्डांतच पाणीपुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यांपाूसन वॉर्ड नं. १ व ४ च्या नागरिकांनी प्रशासनाला पाणीटंचाईबाबत वारंवार सूचना व तक्रारी दिल्या. त्यावर प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे पाणीप्रश्न चिघळू लागला आहे. पहाटे नळ येण्याची वाट महिलांनी बघितली. परंतु नळ आलेच नसल्याने त्या सर्व महिला ग्रामपंचायतीवर धडकल्या. तेथे कोणीही उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार हा प्रश्न सोडविण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरत आहे. दत्तक गाव असल्याने खासदारांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.