मेळघाटला पाणीटंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:00 AM2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:53+5:30
मेळघाटात अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना विविध कारणांनी बंद पडल्या. येथे सोलर पंपावर पाणीपुरवठा योजना असली तरी आदिवासींना हातपंपावर गर्दी करावी लागत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे यांनी केल्यानंतर महावितरणकडून पुरवठा घेण्याचे निर्देश चिखलदराचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : उन्हाची दाहकता जाणवू लागली असतानाच लॉकडाऊन झाल्याने कामांची गती मंदावली आहे. त्यातच मेळघाटातील आदिवासींची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. तालुक्यातील पाच गावांमध्ये मंगळवारपासून टँकरने पुरवठा केला जात आहे, तर दहा गावांतील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
मेळघाटात अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना विविध कारणांनी बंद पडल्या. येथे सोलर पंपावर पाणीपुरवठा योजना असली तरी आदिवासींना हातपंपावर गर्दी करावी लागत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे यांनी केल्यानंतर महावितरणकडून पुरवठा घेण्याचे निर्देश चिखलदराचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिले.
सोनापूरमधील एकझिरा, बगदरी, सोमवारखेडा, मलकापूर, आकी या गावांमध्ये तात्काळ पाच टँकर सुरू करण्यात आले आहे. कोरडा, हतरू, कुलंगना खु, सावरपाणी, खंडूखेडा आदी जवळापास दहा गावांतील विहिरी अधिग्रहीत करण्यात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
१५ गावांत टँकरने पुरवठा
उन्हाळ्यात चिखलदरा तालुक्यातील आदिवासींना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तारूबंदा, भांद्री, लवादा (शहापूर), सोमवारखेडा, खिरपाणी, आडनदी, सोनापूर, मलकापूर, बहादरपूर, धरमडोह, मनभंग, पिपादरी, पाचडोंगरी, आकी, कोयलारी, बगदरी, एकझिरा अशा १५ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात भीषण पाणीटंचाई पाहता, टँकरने पुरवठा केला जाणार आहे. अंबापाटी, बिहाली, नवलगाव, राक्षा, भांडुम येथील पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती तसेच बोरी, जामुननाला, हिरडा, हिरदामल येथे तात्पुरती योजना मंजूर करण्यात आली आहे.
तालुक्यातील १५ तीव्र टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. मंगळवारपासून पाच गावांमध्ये पुरवठा सुरू करण्यात आला. काही गावांतील नळ योजना दुरुस्ती व तात्पुरत्या नवीन मंजूर करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी चिखलदरा