पाणीटंचाई तीव्र; टँकरवारीत दहापटीने वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:37 PM2019-02-04T18:37:26+5:302019-02-04T18:37:49+5:30
गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे.
- प्रदीप भाकरे
अमरावती : गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे. पाणीपुरवठा विभागानुसार, राज्यात २ फेब्रुवारीपर्यंत २ हजार ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केवळ २०२ टँकर्स पेयजलाचा पुरवठा करीत होते.
सरासरीपेक्षा कमी पाऊस, सिंचनप्रकल्पांना पडलेली कोरड पाणीटंचाईत भर पाडणारी ठरली आहे. तूर्तास राज्यातील १,६८८ गावे व ३,७३९ वाड्यांना १६५ शासकीय व १८७६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवार २०१८ मध्ये राज्यातील २३४ गावे व ३ वाड्यांनाच पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने वाढ झाली असताना पाणीटंचाई असलेल्या गाववाड्यांमध्ये तर २५ पटीने वाढ झाली आहे.
तूर्तास, ठाणे विभागातील ५ गावे व ११ वाड्यांना ७ टँकरने, नाशिक विभागातील ५२२ गावे व २०९० वाड्यांमध्ये ५७६ टँकर, पुणे विभागातील १९८ गावे व १३२२ वाड्यांमध्ये २०० टँकर, औरंगाबाद विभागातील ९०४ गावे व ३१६ वाड्यांमध्ये १२०० टँकर, अमरावती विभागातील ५९ गावांमध्ये ५८ टँकर अशा एकूण २ हजार ४१ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे.
जलसाठा घटला
राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे विभागातील एकूण ३,२६७ सिंचन प्रकल्पांमध्ये ४ फेब्रुवारीअखेर केवळ ३८.६८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो ५४.९४ टक्के होता. जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नोंदीनुसार, अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांमध्ये ३५.९४ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये ११.७५ टक्के, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये १९.९३ टक्के, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ६१.९ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये ३५.६५ व पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये ५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.