रखरखत्या उन्हामुळे जलस्रोत कोरडेठाक; १७ टँकर, ४८ विहिरींचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 11:37 AM2022-05-25T11:37:02+5:302022-05-25T11:39:37+5:30
तात्पुरती उपाययोजना म्हणून ७१ गावांमध्ये ३२ विंधन विहिरी व ४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
अमरावती : मे महिन्यातील रखरखत्या उन्हामुळे गावांगावातील जलस्रोत कोरडेठाक पडले आहे, त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे १७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय टंचाईग्रस्त गावांमध्ये २९१ उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तात्पुरती उपाययोजना म्हणून ७१ गावांमध्ये ३२ विंधन विहिरी व ४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गतवर्षी नोव्हेंबरपर्यंत पावसाची रिपरीप सुरू होती. बारा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे जमिनीत पूनर्भरण झाले व भूजलस्तर वाढला. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाई उद्भवली नाही; मात्र मार्चअखेरपासून तापमान ४० अंशावर गेल्यानंतर मात्र मेळघाटातील उंचावरील गावे तहानली. या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आराखड्यानुसार २९१ उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
एप्रिलपश्चात ग्रामीणमधील ७५ गावांमध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. यासाठी बोअरवेल, विंधनविहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये तिवसा तालुक्यात १, मोर्शी ६, वरुड १, अचलपूर ७, चिखलदरा १६ व धारणी तालुक्यात १ विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.
याशिवाय ४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ४, नांदगाव खंडेश्वर १४, भातकुली १, तिवसा २, मोर्शी ५, वरुड २, चांदूर रेल्वे ११, अचलपूर १, चिखलदरा ५, धारणी २ व धामणगाव तालुक्यात १ विहिरीचा समावेश आहे.
चिखलदरा तालुक्यात १६ टँकर
जिल्ह्यात सद्यस्थितीत १७ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. यामध्ये सर्वाधिक १६ टँकर चिखलदरा तालुक्यात आहेत. यात एकझिरा, मोथा, आकी, बगदरी, तारुबांदा, बहादरपूर, धरमडोह, लवादा, आलाडोह, रायपूर, गौलखेडा, सोमवारखेडा, नागापूर, कंडूखेडा, आवागड व खोंगडा तसेच चांदूर रेल्वे तालुक्यात सावंग्री मग्रापूर या गावात टँकरने पाणी पुरवठा होत आहे.
६३० पैकी २९१ उपाययोजना सुरू
कृती आराखड्यात तहानलेल्या ६३० गावांसाठी २९१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी २९१ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. वहीकामे प्रगतीत आहेत. यामध्ये ८४ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, ६ तात्पुरत्या पुरक नळ योजना, १७ टँकर, ८० विहिरींचे अधिग्रहण, १०४ नवीन विंधन विहिरी, कूपनलिका या कामांचा समावेश आहे.