जंगलातील पाणीस्रोत आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:28 PM2019-01-02T22:28:01+5:302019-01-02T22:28:41+5:30

वडाळी व चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रातील आटलेल्या जलस्रोतांमुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अपघाताचे प्रमाण अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर वाढले आहेत.

Water sources in the forest are over | जंगलातील पाणीस्रोत आटले

जंगलातील पाणीस्रोत आटले

Next
ठळक मुद्देवडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र : कृत्रिम पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची मदार

लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा : वडाळी व चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रातील आटलेल्या जलस्रोतांमुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अपघाताचे प्रमाण अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर वाढले आहेत.
मान्सून यंदा अतिशय कमी झाल्याने नैसर्गिक स्रोत पूर्णपणे आटले. यामुळे या जंगलामध्ये ज्या पाणवठ्यांमध्ये वर्षभर पाणी राहायचे, तेदेखील आटले आहेत. वनविभागाच्या माध्यमातून दोन्ही वनक्षेत्रांमध्ये काही सिमेंटचे पाणवठे, तर काही नैसर्गिक पाणवठे तयार करण्यात आले. सिमेंटच्या पाणवठ्याचा आधार झाला, तरीही तो पुरेसा नाही. बरेचसे वन्यप्राणी त्यांची जागा सोडत नाहीत. विशेषत: हरिण, माकडे, रानडुक्कर, रोही हे दुपारी १२ ते ४ या वेळेत वनक्षेत्रातील पाणवठ्यांवर तहान भागवितात. यावर्षी काही पाणवठे आटल्यामुळे ते गावतलावांकडे कूच करीत आहे. मात्र, तेथे पाळीव जनावरे असल्यामुळे वर्दळ कमी झाल्यानंतर रात्री उशिरा ते तहान भागविण्यासाठी या वनक्षेत्रातून त्या वनक्षेत्रात रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत मृत्यू ओढवण्याची घटना नित्याची झाली आहे.
वरूडा व पानखोरीचे वनक्षेत्र वन्यप्राण्यांच्या वास्तव्यास अतिशय समृद्ध आहे. त्यामुळे या भागात आणखी पाणवठ्यांची गरज आहे. वनविभागाने जेवढे जलस्रोत निर्माण केले, तेथे पोहोचण्यासाठी चांदूर रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो. यामध्ये २०१८ च्या उत्तरार्धात पाच हरिणांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला. वडाळी, पोहरा, चिरडी, मार्डी, मालेगाव, मालखेड, कारला, भानखेडा, गोविंदपूर, अंजनगाव बारी, कोंडेश्वर या राखीव जंगलात वन्यपशूंची संख्या वाढीस लागली आहे. त्यांचा रस्ते अपघातातून बचाव व्हावा, यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे राज्य मार्गावरील वनक्षेत्रात गतिरोधक बसविण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वनविभागाने सादर केला. १० वर्षांपूर्वी अमरावती-चांदूर रेल्वे रस्ता ओलांडताना चार बिबट्यांचा मृत्यू झाला, ही बाबसुद्धा वनविभागाने प्रस्तावात नमूद केली आहे.
समृद्ध वन्यजीवन
अमरावतीनजीकच्या एसआरपी क्वार्टर्सपासून राखीव वनक्षेत्र सुरू होते. ते क्षेत्र पुढे चांदूर रेल्वेपर्यंत विस्तारले आहे. यामध्ये बिबट, हरीण, चितळ, रानडुक्कर, रानकुत्रे, रोही, चिंकारा, भेडकी, काळविट, सोनकुत्रे, मोर, सायाळ आदी वन्यपशू आहेत. राखीव जंगलात एका क्षेत्रातून दुसरीकडे जाताना राज्य मार्ग ओलांडावा लागतो. हा मार्ग ओलांडताना वन्यपशूंचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे कळविले आहे.
- आशिष कोकाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूर रेल्वे

सिमेंटच्या पाणवठ्याची पाहणी, स्वच्छता दरदिवशी येथील वनरक्षक, वनमजूर करतात. रस्ता अपघाताबाबत उपाययोजना केल्या आहेत.
- कैलास भुंबर, वनपरिक्षेत्र अधिकारी वडाळी

Web Title: Water sources in the forest are over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.