भरपावसाळ्यातही मेळघाटातील नऊ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा; स्रोत मृतच
By जितेंद्र दखने | Published: July 17, 2024 07:50 PM2024-07-17T19:50:52+5:302024-07-17T19:51:31+5:30
भूजलपातळीत वाढ न झाल्याने टंचाई कायम
अमरावती : जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै या कालावधीत आतापर्यंत २२४ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, विखुरलेल्या स्वरूपातील या पावसाने टंचाईग्रस्त गावांतील भूगर्भातील जलपातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे मेळघाटातील नऊ गावांतील ६ हजार २८३ नागरिकांची तहान अद्यापही टँकरच्या पाण्यावरच भागविली जात आहे. टँकरग्रस्त सर्व नऊ गावे चिखलदरा तालुक्यातील आहेत.
उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत आटत असल्याने निर्माण होणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर तोडगा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था करण्यात येते. यंदा मार्च महिन्यापासून टँकर सुरू करण्यात येतात. पावसाळ्यात ती साधारणतः बंद केली जातात. यंदा अजूनही नऊ गावांमध्ये टँकर सुरूच आहेत. ही सर्व गावे मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आहेत. यंदा १ जून ते ११ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी २२४ मिमी पाऊस झाला असून, सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत त्याचे प्रमाण ९२ टक्के आहे.
तथापि, आतापर्यंत झालेला पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असल्याने त्याचे वितरण, सर्व भागात संतुलित प्रमाणात चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांना पाण्याचे टँकर सुरू आहेत. चिखलदरा तालुक्यात दरवर्षी पावसाची सरासरी अधिक राहते. यंदा आतापर्यंत या तालुक्यात २९९ मिमी पाऊस झाला असून, सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत त्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत झालेले नाहीत. परिणामी पाण्याची टंचाई कायम आहे, असे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले.
या नऊही गावांतील पाण्याचे स्रोत जिवंत झालेले नाहीत. त्यामुळे तब्बल ६ हजार २८३ नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. भूगर्भातील पाणीपातळी वाढून स्रोत जिवंत होण्यासाठी अजून महिना लागणार आहे. पावसाच्या सरासरीचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
‘या’ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा
टँकरग्रस्त गावांमध्ये मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार, गवळीढाणा (कोरडा), स्कूलढाणा (कोरडा), कालापांढरी (कोरडा) या गावांचा समावेश आहे.