पाणीपुरवठा योजनेतील घोटाळा गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:17 AM2019-02-23T01:17:37+5:302019-02-23T01:18:17+5:30
ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या कामांत स्थानिक पदाधिकारी व अधिकाºयांच्या संगनमताने घोटाळे होत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आला. काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी अपहाराचा पर्दाफाश केल्याने हा मुद्दा सभेत चांगलाच गाजला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या कामांत स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळे होत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आला. काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी अपहाराचा पर्दाफाश केल्याने हा मुद्दा सभेत चांगलाच गाजला.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा २१ फेब्रुवारी रोजी विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, वनिता पाल, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंग गैलवार, अभिजित बोके, सुनील डीके, प्रियंका दगडकर, सुहासिनी ढेपे, अॅडिशनल सीईओ विनय ठमके, कॅफो रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ नारायण सानप आदी उपस्थित होते. सभेत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा येथे पाणीटंचाई योजनेंतर्गत सन २०१७-१८ मध्ये पाणीपुरवठा योजनेचे १४ लाख ५० हजार रूपयांचे काम मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार या गावात मंजूर असलेली मात्र न केलेल्या कामांचेही सुमारे ८.५० लाख रूपयांचे देयके काढल्याची गंभीर बाब उघडकीस आली.
जिल्हा पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणलेल्या या कामांची झेडपी स्तरावरून केलेल्या चौकशी समितीनेही पाणीपुरवठा योजनेतील घोटाळ्याच्या चौकशी अहवालात यावर शिक्कामोर्तब केले. पाणीपुरवठा योजनेच्या कामांतील हा घोटाळा कुऱ्हा येथेच नव्हे तर अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, सचिव व पाणीपुरठ्याचे अधिकारी यांच्या संगमताने होत असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे. कुºहा येथे १४.५० लाख रूपयांच्या कामात २२५० फुट पाइप लाइनच्या कामापैकी प्रत्यक्षात १७०० फुटांचे काम केले. यामध्ये लोखंडी पाइपचा अंतर्भाव असताना कुठेही लोखंडी पाइप टाकलेले नाही. सिमेंट क्राँक्रिट करणे आवश्यक असताना तेही केले नाही. टीनशेड, पॅनल बोर्ड, मीटर, मेन स्विच लावले नाहीत. अशी सुमारे १४ लाख ५० हजार रूपयांपैकी ८.५० लाख रूपये कामे केलेली नाहीत. तरीदेखील देयके पूर्ण काढण्यात आले आहेत. कुऱ्हा येथे लाखो रूपयांची पाणीटंचाईची कामे केल्यानंतरही गावकºयांना वर्षभरापासून पाण्याचा थेंबही मिळाला नसल्यामुळे या घोटाळ्याच्या मुद्दावर बबलू देशमुख पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर चांगले संप्तत झाले. परिणामी या सर्व प्रकरणांची चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी सभागृहात केली. यावर अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी चौकशी अहवालाच्या अनुषंगाने यातील दोषी ग्रामपंचायचत पदाधिकारी, सचिव व पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांच्यावर फौजदारी कारवाईचे निर्र्देश सीईओंना दिले. यावेळी सभेत पशुसंवर्धन, बांधकाम, मग्रारोहयो याही विभागाचे मुद्दे पदाधिकारी व सदस्यांनी मांडले. सभेला डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, राजेंद्र सावळकर, प्रमोद तलवारे, शिक्षणाधिकारी आर.डी तुरणकर, विजय राहाटे व अन्य खातेप्रमुख तसेच बीडीओ उपस्थित होते.
समृद्धी महामार्गासाठी पाण्यास नकार
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यात नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्ग वाघोळा या गावातून जात आहे. सदर रस्त्याच्या कामाला झेडपीने नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव पारित करून एनओसीसुद्धा दिली असताना झेडपीच्या तलावातील पाणी समृद्धी महामार्गासाठी देण्यास नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, असा प्रस्ताव सदस्य सुहासिनी ढेपे यांनी मांडला. मात्र हा प्रस्ताव सत्ता पक्षाने फेटाळून लावल्याने ढेपे यांनी यावर आक्षेप नोंदविला आहे.
शौचालय अनुदास कोलदांडा
धारणी तालुक्यातील चटवाबोड, केकदाबोड, कसाईखेडा, पाडीदम आदी गावांमध्ये शौचालयाचे ४६८ कामांपैकी २३७ शौचालयांना दरवाजे, शिट, टाकी, टिनपत्रे पाईप आदी कामे पूर्ण केले नाहीत. यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे ५५ लाख रूपयांचा निधी मागितला. त्यापैकी केवळ २३ लाख ४ हजार रूपये मिळाले आहेत. मात्र उर्वरित पैसे लाभार्थ्यांना तातडीने देण्यात यावे, अशी मागणी सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी सभेत केली. यामध्ये निधी देण्यास कुचराई करणाºयावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी सभेत केली.
अनुदानाची बोंबाबोंब
झेडपी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत पात्र मागासवर्गीय लाभार्थ्यांना अनुदानावर पुरविलेल्या साहित्याचे ७० ते ८० फायली गहाळ झाल्याचा मुद्दा मागील सभेत सुनील डीके यांनी मांडला. यावर शुक्रवारी मात्र फायली सापडल्या अन् साहित्याच्या पावत्या लाभार्थ्यांना देयकेसुद्धा दिल्याचे स्पष्टीकरण या विभागाच्या अधिकाºयांनी सभेत दिले. मग आतापर्यंत फायली का दिसल्या नव्हत्या, असा प्रश्न उपस्थित करीत दोषींवर कारवाईची मागणी सदस्यांनी केली.