११ गावांतील पाणीपुरवठा योजनांना मिळणार सौर ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:13 AM2021-04-09T04:13:05+5:302021-04-09T04:13:05+5:30
मोर्शी : मोर्शी, वरूड तालुक्यातील अंबाडा, पिंपळखुटा मोठा, रिद्धपूर, आमनेर, वरूड, टेंभुरखेडा, पुसला, बेनोडा, राजुरा बाजार, लोणी, पळसवाडा ...
मोर्शी : मोर्शी, वरूड तालुक्यातील अंबाडा, पिंपळखुटा मोठा, रिद्धपूर, आमनेर, वरूड, टेंभुरखेडा, पुसला, बेनोडा, राजुरा बाजार, लोणी, पळसवाडा या ११ गावांतील पाणीपुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जेचा आधार मिळणार आहे. त्याकरिता राज्य शासनाच्यावतीने १ कोटी ९८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तालुक्यातील अंबाडा, पिंपळखुटा (मोठा), रिद्धपूर, वरूड तालुक्यातील आमनेर, वरूड, टेंभुरखेडा, पुसला, राजुरा बाजार, लोणी, पळसवाडा या गावांत २००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. मोर्शी वरूड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेवरील मोटरपंप सध्या विद्युत जोडणीव्दारे चालू आहे. परंतु वारंवार वीजपुरवठा खंडित होणे तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी खर्ची पडलेल्या विजेची देयके मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे विद्युत देयकांचा भरणा करण्यासाठी ग्रामपंचायतींना अडचणी निर्माण होत आहे. मोर्शी, वरूड तालुक्यातील अत्यंत खोल गेलेली पाण्याची पातळी व पिण्याच्या पाण्याची निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन या ११ गावांतील पाणीपुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे. सौर ऊर्जा योजना मंजूर झाल्यामुळे सलग १२ तास ग्रामीण भागात पाणीपुरवठा होणार आहे. अपारंपरिक ऊर्जा संवर्धनासाठी राज्यात सौर ऊर्जा धोरण तयार करण्यात येत असून, येत्या पाच वर्षांत वरूड, मोर्शी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करून कृषीपंप सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहे.