पाणी लबालब, पुरवठा दिवसाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:05 AM2019-05-18T01:05:32+5:302019-05-18T01:05:52+5:30
अमरावतीकरांना तहान भागविण्यासाठी पाणी आहे; मात्र ते एक दिवसाआड करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सर्वाधिक परिणाम अमरावतीकरांच्या दैनंदिन नियोजनावर झालेला आहे. याशिवाय साठवणुकीची साधने, नळाची प्रतीक्षा व अतिरिक्त पाण्याचे काय करायचे, हे मुद्दे पुढे येत आहेत.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावतीकरांना तहान भागविण्यासाठी पाणी आहे; मात्र ते एक दिवसाआड करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सर्वाधिक परिणाम अमरावतीकरांच्या दैनंदिन नियोजनावर झालेला आहे. याशिवाय साठवणुकीची साधने, नळाची प्रतीक्षा व अतिरिक्त पाण्याचे काय करायचे, हे मुद्दे पुढे येत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी वितरणाची प्रणाली सदोष असल्यामुळे अमरावतीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मजीप्राच्या पाण्यावर तहान भागविणाऱ्या अमरावतीकरांवर मुबलक पुरवठा होत नसल्यामुळे आता बोअरवेलची वेळ आली. त्यामुळे शहरात बोअरवेलचा सपाटा सुरू झाला आहे. भर उन्हाळ्यात शहरातील पाणीपातळीसुद्धा खालावली आहे. त्यामुळे वापराच्या पाण्याची धुराही मजीप्राच्या पाण्यावर आली आहे. त्यातच मजीप्राच्या नळाची वेळ अनिश्चित असल्यामुळे अक्षरश: अमरावतीकरांची दिनचर्याच बिघडली आहे. कामकरी पुरुषांनीही आता पाणी भरण्यासाठी गुंतावे लागत आहे. त्यामुळे अमरावतीकर पाणी संकटामुळे मानसिक तणावातसुद्धा आल्याचे दिसत आहे. एकीकडे ‘पाणी वाचवा’चा संदेश मजीप्रा देते, तर दुसरीकडे पाणी नासाडीकडे दुर्लक्ष चालविले आहे. अनेक घरी पाहुण्यांना पाणी जपून वापरा, असे सल्ले दिले जात आहेत. पाणी मुबलक; मात्र नियोजन नाही, कोणाला अधिक, तर कुणाला थेंबभरही मिळत नसल्याचे चित्र अमरावती शहरात आहे. मजीप्राची सदोष वितरण प्रणालीने निर्माण केलेल्या पाणीटंचाईमुळे अमरावतीकरांच्या जीवनप्रवाहावर मोठा परिणाम झाला आहे.
नळांना तोट्याच नसल्याने पाणी नासाडी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून विविध परिसरातील सार्वजनिक नळांना पाणीपुरवठा केला जातो. या सार्वजनिक नळांची देयके भरण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्या नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. नळातील पाणी अक्षरश: नाल्यांमधून वाहते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेने काही नळ बंद करण्यास मजीप्राला सांगितले. मात्र, नागरिकांचा रोष कोण पत्करणार, याचीच भीती अधिकाऱ्यांना आहे.
१० टक्के पाणी चोरीला
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीचोरांवर लक्ष ठेवून असल्याचे सांगते. मात्र, पाणीचोरीला अंकुश घालण्यात मजीप्रा सपशेल अपयशी ठरली आहे. मजीप्रा अधिकाºयांच्या सांगण्यानुसार, शहरात १० टक्के पाणी चोरीला जाते. मात्र, पाणी चोरीचा टक्केवारी अधिकच आहे. एकीकडे पाण्याचे पैसे भरूनही पाणी मिळत नाही, तर दुसरी पाणी चोर फुकटातच पाणी मिळवत आहे.
लोकप्रतिनिधींचे कर्तव्य काहीच नाही का?
शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष देणे ही जबाबदारी लोकप्रतिनिधी आहे. मात्र, एकही लोकप्रतिनिधीच्या गावी पाणीटंचाई ही समस्याच नसावी. मजीप्राने नियोजनबद्ध वाटप केल्यास पाणी समस्या चुटकीसरशी दूर होईल. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा आवश्यक आहे.
नळ येण्याची वेळ पाहून न्हाणोरा
लग्नसराईचा मोसम शहरात असताना, वधु-वर पक्षालाही नळाच्या पाण्याची चिंता पडलेली आहे. दीड दिवसांनी नळ येत असल्यामुळे, त्यानुसार न्हाणोºयाचा दिवस निश्चित केला जात आहे. असाच एक प्रकार कठोरा नाका परिसरात पुढे आला. एका कुटुंबातील लग्न सोहळ्यात न्हाणोरा करण्यासाठी नळ येण्याची दिवस निश्चित केला गेला.
उन्हाळ्यात बोअर व विहिरी आटत असल्यामुळे वापरासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. नवे जलशुद्धीकरण केंद्र झाल्यानंतर पाणी समस्या राहणार नाही.
- किशोर सूर्यवंशी, उपविभागीय अभियंता, मजीप्रा.
उन्हाळ्यामुळे कूलरला अधिक पाणी लागते. नळाचे पाणी पुरत नाही. त्यामुळे पाणीटंचाई भासत आहे. मजीप्रा केव्हा देणार २४ तास पाणी?
- सुनिता धंदर,
अर्जुननगर,
दीड दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे लग्नातील पाहुण्यांसाठी पाणी पुरत नाही. न्हाणोराचे आयोजन नळ येण्याच्या दिवसावर करण्याची विचित्र स्थिती आमच्यावर आली.
- उषा अविनाश बोके
न्यू स्वस्तिक नगर.
दररोज पाणी मिळत नसल्यामुळे चणचण भासते. साठवणुकीसाठी साहित्य नाही, हे महत्त्वाचे. अधिक पाणी साठविल्यास ते दुसºया दिवशी पिण्यायोग्यही राहत नाही.
- राजेंद्र विधळे, वडाळी.
कूलरमुळे वाढला ताण
उन्हाळ्याच्या दिवसांत कूलरसाठी सर्वाधिक पाण्याची गरज असते. गार हवा आवश्यकच आहे; मात्र पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे नागरिकांना विचार करावा लागत आहे. एकदा कूलरचे पाणी संपले की, दुसºयांदा पाणी टाकण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अनेकांनी कूलर लावण्याच्या वेळासुद्धा ठरवून घेतल्या आहेत.