मेळघाटात टँकरने पाणीपुरवठा
By Admin | Published: March 24, 2017 12:12 AM2017-03-24T00:12:57+5:302017-03-24T00:12:57+5:30
उन्हाळ्याची सुरुवात होण्याआधीच मेळघाटातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.
पाणीटंचाई : चिखलदऱ्यातील १४ गावांना झळ, खासगी विहिरींचे अधिग्रहण सुरू
चिखलदरा : उन्हाळ्याची सुरुवात होण्याआधीच मेळघाटातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. चिखलदरा तालुक्यातील पस्तलाई गावात मागील आठवड्यापासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर कोरडा गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील चौदा गावांमध्ये उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे.
चिखलदरा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरील पस्तलाई गावात मागील आठवड्यापासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर अतिदुर्गम कोरडा गावातील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येथील विहिरी आटल्यास येथेही टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून मेळघाटात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाच्या टँकरमुक्त महाराष्ट्राचा फज्जा मेळघाटात उडाल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील चौदा गावांत टंचाई
तालुक्यातील कोरडा, कोहणा, खडीमल, आवागड, पस्तलाई, मोथाखेडा, तारुबांदा ही सात गावे पाणीटंचाईच्या दुसऱ्या टप्प्यात मोडतात. पाचडोंगरी, कोयलारी, कालापाणी, ढोबनवर्डा, पिदरी, खडकाली, माखला या गावांचा समावेश एप्रिल ते जूनपर्यंत तिसऱ्या टप्प्यात होतो. तालुक्यातील १० गावांमध्ये टँकर व विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्याची मागणी चिखली जि.प.सदस्य वासंती मंगरोळे यांनी केली आहे.