जिल्ह्यात २८ टँकर,२४४ विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:21 PM2019-05-13T23:21:37+5:302019-05-13T23:21:56+5:30
जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांच्या अडचणीत भर टाकली आहे. जिल्ह्यात सध्या २७ गावांमध्ये २८ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असली तरी टँकरची मागणी दिवसेदिवस वाढत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी २४४ गावांत २४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांच्या अडचणीत भर टाकली आहे. जिल्ह्यात सध्या २७ गावांमध्ये २८ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असली तरी टँकरची मागणी दिवसेदिवस वाढत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी २४४ गावांत २४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात यावर्षी तीव्र दुष्काळ आहे. शहरात नळाला दोन दिवसांआड पाणी येते, तर ग्रामीण भागात अतिशय विदारक परिस्थिती आहे. पूर्वी केवळ मेळघाटात टँकरद्वारे पाणीपुरवठा व्यवस्था करावी लागायची. यावर्षी मेळघाटातील गावांसह अमरावती, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, मोर्शी तालुक्यांतील गावांमध्येही पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील २७ गावे आज टँकरवर आहेत. चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहादरपूर, मनभंग, आडनदी, सोनापूर, पिपादरी, खिरपाणी, खटकाली, खडीमल, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, भांद्री या गावांसह चांदूर बाजारमधील घाटलाडकी, गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
अमरावती तालुक्यातील बोडणा, परसोडा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर, जळका जगताप, मोर्शी तालुक्यातील लेहेगाव, सावरखेड, आसोना आणि वाघोली आदी गावांमध्ये टँकर सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रीतेश मुंडे यांनी दिली. सदर गावांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या आमला विश्वेश्वर या गावात तीन हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर दिवसातून दोन वेळा पाणी आणून गावातील टाकीत भरतात. दोन्ही टाकीतील पाणी आठवड्यातून एक दिवस नळावाटे गावात पुरवले जाते. गावात सध्या एकच हातपंप आहे. त्याचे पाणीदेखील आटले आहे. जळका जगताप या गावातही दोन दिवसांत टँकर येतो. टँकरचे पाणी टाकीत सोडले जाते. आठवड्यातून एक दिवस नळावाटे येणारे पाणी केवळ अर्धा तास पुरविले जाते, अशी ग्रामस्थांची ओरड आहे. सद्यस्थितीत मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची संख्या वाढली आहे, तर विहीर अधिग्रहणाची जिल्ह्यातील संख्या २४४ वर पोहोचली आहे. यावरून पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
विशेष दुरुस्तीची ७० गावात ७० कामे
तात्पुरत्या पूरक नळ योजनांची कामे जिल्हाभरातील ३८ गावांत सुरू आहेत. नळ योजनांची विशेष दुरुस्तीची ७० गावांत ७० कामे केली जात आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली असून, काही ठिकाणी कामे प्रगतिपथावर असल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.