पावसाळ्याअखेर ६५० गाव-वाड्यांमध्ये ‘टँकरवारी’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 03:46 PM2018-09-17T15:46:29+5:302018-09-17T15:58:17+5:30
राज्यभरात तब्बल ६५० गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची स्थिती उद्भवली आहे.
प्रदीप भाकरे
अमरावती - यंदाच्या मोसमातील परतीचा पाऊस अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, राज्यभरात तब्बल ६५० गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची स्थिती उद्भवली आहे. राज्यातील धरणांमधील जलसाठा अवघा ६६ टक्क्यांवर स्थिरावल्याने या जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही तीन वर्षांपूर्वी कोरड्या दुष्काळात होरपळून निघालेल्या मराठवाडा विभागात जलसाठ्याची उपलब्धता चिंताजनक बनली आहे. पावसाचे शिल्लक दिवस पाहता, हिवाळ्यातच राज्याच्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या उद्भवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, १० सप्टेंबरअखेर राज्यातील २५९ गावे आणि ३९१ वाड्यांमध्ये एकूण २५८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागातील ९१ गावे व २८८ वाड्यांना एकूण ७८ टँकरने पेयजलाचा पुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील ११८ गाव-वाड्यांची तहान १७ टँकरने भागविली जात आहे. औरंगाबाद विभागातील १४२ गावे व ३ वाड्यांना सर्वाधिक १५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १२९ गावांत १३६ व जालना जिल्ह्यातील १४ गाव-वाड्यांमध्ये १७ टँकर लावण्यात आले आहेत. अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील आठ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र कुमटगी यांनी जाहीर केली आहे. नागपूर, कोकण व अमरावती विभागातील बुलडाणा वगळता अन्य चार जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी १० सप्टेंबरअखेर राज्यातील १८१६ गाव-वाड्यांमध्ये ३०२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.
३२६७ प्रकल्पांमध्ये ६६.३६ टक्के पाणी
राज्यातील ३२६७ जलप्रकल्पांमध्ये १७ सप्टेंबरअखेर ६६.३६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यात अमरावती प्रदेशातील ४४५ प्रकल्पांमध्ये ५७.३८, कोकण प्रदेशातील १७६ प्रकल्पांमध्ये ९२.५६, नागपूर प्रदेशातील ३८४ प्रकल्पांमध्ये ४९.८६, नाशिक प्रदेशातील ५७१ प्रकल्पांमध्ये ६४.४९, पुणे प्रदेशातील ७२६ प्रकल्पांमध्ये ८६.७१ व मराठवाडा प्रदेशातील ९६५ प्रकल्पांमध्ये केवळ २८.८३ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.