ग्रामीण भागातील नागरिकांचा पाणी पुरवठा होणार बंद !
By उज्वल भालेकर | Published: February 7, 2024 05:22 PM2024-02-07T17:22:30+5:302024-02-07T17:23:31+5:30
६८६ ग्रामपंचायतीमधील पाणी पुरवठा योजनेकडे २८ कोटींचे वीज बिल थकीत.
उज्वल भालेकर, अमरावती : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. परंतु जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ६८६ ग्रामपंचायतीकडे २८ कोटी रुपयांचे वीजबिल थकल्यामुळे या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबधित ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेतील थकीत वीजबिल तातडीने भरुन वीज पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण अमरावती ग्रामीण विभागांतर्गत अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव रेल्वे, आणि भातकुली तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत ६८६ पाणी पुरवठा योजनेला महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येत आहे. परंतु संबधित ग्रामपंचात प्रशासनाकडून या योजनेतील वीज बिल न भरल्याने जवळपास २८ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामीण भागात पाणी प्रश्न पेटू नये, यासाठी महावितरणकडून वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार देखील केला. परंतु तरीही ग्रामपंचातयतीकडून थकित वीज बिल भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामुळे बील न भरणाऱ्या ग्रामपंचायतीमधील पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशाराच महावितरणने दिला आहे.