बडनेरा शहरात थेट व्हॉल्व्हमधूनच पाण्याची चोरी
By Admin | Published: May 15, 2017 12:14 AM2017-05-15T00:14:15+5:302017-05-15T00:14:15+5:30
प्राधिकरणद्वारे टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्हलाच थेट पाईप जोडून एका ढाबा मालकाने चक्क पाणी खेचणे सुरू केले आहे.
बायपासनजीकचा प्रकार : ढाबा मालक शिरजोर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला चुना, कारवाईकडे पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : प्राधिकरणद्वारे टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्हलाच थेट पाईप जोडून एका ढाबा मालकाने चक्क पाणी खेचणे सुरू केले आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून इतरही लोक प्राधिकरणच्या पाण्याची चोरी करीत आहे. यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून नियमित देयके भरणाऱ्या नागरिकांना मात्र विनाकारण आगाऊ देयकांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्राधिकरणने यावर कारवाई करावी, अशी मागणी अधिकृत नळ कनेक्शनधारकांद्वारे केली जात आहे.
अमरावतीकडून एमआयडीसी मार्गाने बडनेऱ्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत जीवन प्राधिकरणने मुख्य पाइपलाईन जोडली आहे. या पाईपलाईनमधून पाणी सोडताना अडथळा निर्माण होऊ नये, पाण्याचे बुडबुडे येऊ नयेत, यासाठी ठराविक अंतरावर ‘एअर व्हॉल्व्ह’ दिले आहेत. असाच एक व्हॉल्व्ह निंभोरा वीटभट्टीनजीकदेखील बसविण्यात आला आहे. येथून पाणी थेट बडनेरा येथील पाण्याच्या मुख्य टाकीत सोडून तेथून नागरिकांना दररोज पाणीपुरवठा केला जातो. मात्र, निंभोरानजीकच्या व्हॉल्व्हलाच चक्क पाइप जोडून एक ढाबामालक थेट पाणी चोरत आहे. हजारो लीटर पाण्याचा अपव्यय तर सुरू आहेच; पण पाण्याच्या या चोेरीमुळे प्राधिकरणला हजारो रूपयांचा चुना लागत आहे. ही पाईपलाईन कुणी फोडली वा ती लिकेज आहे काय, हे कळू शकले नाही.
जुन्या बायपासलगतच्या मार्गावर हे चित्र सहज दृष्टीस पडू शकते. एकीकडे बडनेरा शहरात पुरेसा व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड सुरू असते. सध्या पाणी देयकांच्या वसुलीसाठी फोटो रिंडिंगची पद्धत अवलंबिली जात असून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले दिली जात आहेत.
प्राधिकरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाण्याचा असा अपव्यय सुरू असताना देखील कोणती कारवाई केली जात नाही. संपूर्ण बडनेरा शहराला एकाच पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जात आहे. ही टाकी भरण्यासाठी पाईपलाईनद्वारे समप्रमाणात पाणी सोडले जात आहे. यामुळे लिकेज पाईपलाईनजवळ पाण्याचे डबके साचले असते. प्राधिकरणने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे.
नियमित तपासणीवर प्रश्नचिन्ह
प्राधिकरणद्वारे मुख्य पाईपलाईन तपासली जात असल्याची माहिती आहे. जुन्या बायपास मार्गावरील एअर व्हॉल्व्ह जर कुणी फोडले असेल किंवा ते लिकेज असेल तर त्याची दुरूस्ती का करण्यात आली नाही, हा प्रश्न निर्माण होतो. यावरून ही तपासणी नियमित होते किंवा नाही, याबाबतही सांशकता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत लाखो लीटर पाण्याच्या अपव्ययासाठी जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्य पाईपलाईन लिकेज आहे वा ती हेतुपुरस्सरपणे फोडण्यात आली आहे, याची शहानिशा केली जाईल. संबंधित दोषींवर तातडीने कारवाई करू.
- किशोर रघुवंशी
उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण