तिवसा तालुक्यात मिळणार अप्पर वर्धाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:47 AM2019-05-13T00:47:07+5:302019-05-13T00:47:53+5:30
भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.
तिवसा : भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.
पाणीटंचाई अधिक गडद झाल्याने अप्पर वर्धा नदीचे पाणी वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी व धरण विभागाला केली होती. त्याची दखल घेत वर्धा नदीच्या पात्रात रविवारपासून दोन दिवस पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावर्षी पावसाळा कमी झाल्याने व पाण्याची पातळी खाली गेल्याने अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. अप्पर वर्धा धरणाला पाणी सोडण्यात येणार असल्याने मोर्शी, तिवसा व धामनगाव रेल्वे या तालुक्याला याचा फायदा होणार आहे. अप्पर वर्धा धरणात आजघडीला १६.७९ टक्केच पाणीसाठा ुशिल्लक आहे. मागील वर्षी तो पाणीसाठा ३७ टक्के होता. दरम्यान, अप्पर वर्धामध्येच मर्यादित पाणीसाठा असल्याने दोन दिवस नदीपात्रात सोडले जाणारे पाणी अल्पच असेल, असा अनेकांचा होरा आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यास मोझरी व तिवसा पाणीपुरवठा योजनेलाही याचा लाभ होणार असल्याची बाब आ. ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली.
धामणगाव तालुक्याच्या २९ गावांना दिलासा
धामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने तालुक्यातील २९ गावांना दिलासा मिळणार आहे. बगाजी सागर धरणात अल्प पाणी साठा असल्याने शहरातील पंचवीस हजार नागरिकांना दोन दिवसा आड पाणी पुरवठा करण्याची पाळी नगर परिषदेवर आली होती. धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे अप्पर वर्धा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.
गरज भासल्यास आणखी पाणी
अमरावती : मुख्यमंत्र्यांकडे ६ मे रोजी नागपूर येथे भाजपाच्यावतीने मागणी केल्यानुसार अप्पर वर्धा धरणातून १२ मे रोजी रात्री १२ वाजता नदीपात्रात १० घनमीटर पाणी सोडले जाईल. यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी उपलब्ध होण्यास मदत व नागरिकांना, गुरांना पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. राज्य सरकार दुष्काळी उपाययोजना राबविण्यास तत्पर असून, गरज भासल्यास आणखी पाणी धरणातून सोडले जाण्याची माहिती भाजप नेत्या निवेदिता दिघडे चौधरी यांनी दिली.