जिल्ह्यात पाणीबाणी, ३७४ गावे तहानली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:27 PM2018-05-16T22:27:18+5:302018-05-16T22:27:18+5:30

गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यातुलनेत भूजलाचा वारेमाप उपसा यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडत आहेत.

Waterborne in the district, thirsty 374 villages | जिल्ह्यात पाणीबाणी, ३७४ गावे तहानली

जिल्ह्यात पाणीबाणी, ३७४ गावे तहानली

Next
ठळक मुद्दे१२७ विहिरींचे अधिग्रहण : १३९ नवीन विंधन विहिरी, १८२ नळ योजनांची विशेष दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यातुलनेत भूजलाचा वारेमाप उपसा यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या ३७४ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे १२७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले, १३९ विंधन विहिरी व कूपनलिकांची कामे सुरू आहेत, तर पाणीपुरवठ्याच्या १८२ नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यात १,४२८ गावांसाठी १,७४५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यासाठी १८ कोटींची आवश्यकता आहे. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ३७४ गावांतील उपाययोजनांना मंजुरी दिलेली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ७८ नवीन विंधन विहिरी, ६१ कुपनलिका, असे एकूण १३९ नवीन विधंन विहिरी, कुपनलिकांना प्रसासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. यापैकी ११५ कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.
पाणीटंचाई अंतर्गत जिल्हा परिषदेकडील १०५ नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीच्या कामांना व मजीप्राकडील ७७ असे एकूण १८२ नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेंतर्गत ७० नळयोजनांची विशेष दुरूस्तीची कामे निविदा प्रक्रियेत आहेत. त्यापैकी ५ कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे प्रगतीत आहे. तात्पुरत्या पूरक नळयोजनांच्या ५० कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे. यापैकी ३६ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. अन्य कामे निविदा प्रक्रियेत आहेत. यापैकी ७ कामे पूर्ण झालेली आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ १०० गावांमध्ये १२७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. पाणीटंचाईची दाहकता वाढल्याने सद्यस्थितीत नऊ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
३८ लघु प्रकल्पांत फक्त डेडवॉटर
भूजल पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यातही दिवसा प्रचंड उष्णतामान असल्याने बाष्पीभवणाचा वेग वाढला आहे. परिणामी जिल्ह्यातील ३८ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामध्ये पिंपळगाव, सूर्यगंगा, दहिगाव धानोरा, खतिजापूर, गोंडवाघोली, सावरपाणी, टोंगलफोडी, मालखेड बासलापूर, सरस्वती, टाकळी, भिवापूर, जळका, अमदोरी, दाभेरी, बेलसावंगी, जमालपूर, रभांग, बोबटो, लवादा, सासई, बेरदा, जुटपानी, मोगर्दा आदींचा समावेश आहे.

नऊ टँकरने पाणीपुरवठा : जिल्ह्यात सद्यस्थितीत ११ गावांमध्ये ९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यात पस्तलाई, भांद्री, कोयलारी, पाचडोंगरी, मनभंग, सोनापूर, सोमवारखेडा, गौरखेडा, तारूबांधा, मोर्शी तालुक्यात सावरखेड व तिवसा तालुक्यात शेंदोळा बुजरूक या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पाण्यासाठी जागते रहो...
मजीप्राचे नियोजन कोलमडले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नेमके काय सुरू आहे, हे सामान्यांना कळणे कठीण झाले आहे. सिंभोरा धरणात भरपूर जलसाठा असल्याचा दावा वारंवार केला जात आहे. असे असताना आया, बहिणींना पाण्यासाठी रात्र जागून का काढावी लागते? याचे चिंतन आता लोकप्रतिनिधींना करावे लागेल, अशी परिस्थिती शहरात उद्भवली आहे.
अमरावती, बडनेरा या महानगराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ही मजीप्राच आहे. मोर्शी नजीकच्या सिंभोरा धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी येत असून, स्थानिक तपोवन परिसरातील जलशुद्धिकरण केंद्रातून नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जातो. हल्ली शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुुरवठ्याशी संबंधित कामे सुरू आहेत. यात जलकुंभाचे निर्माण कार्य, नवीन जलवाहिनी टाकणे, नवीन पंप स्टेशन तयार करणे आदी कामांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याचे यापूर्वी मजीप्रा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दिवसाआड पाणीपुरवठ्याने त्रस्त असलेल्या आया, बहिणींना आता पाण्यासाठी रात्र जागावी लागत आहे. नियोजित वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांच्या मुखी नळ कधी येणार? हीच चर्चा असते.
रात्री ८ चा पाणी पुरवठा पहाटे ३ वाजता
बडनेरा नवीवस्तीच्या आदिवासीनगर, सिंधीकॅम्प, इंदिरानगर, पंचशिलनगर आदी परिसरात रात्री ८ वाजता नियोजित वेळेनुसार पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, मंगळवारी १५ मे रोजी पहाटे ३ वाजता पाणी पुरवठा करण्याचा प्रताप मजीप्राने केला आहे. नळाला पाणी आता येईल, नंतर येईल असे म्हणत आया, बहिणींना चक्क रात्रभर जागावे लागत आहे.

उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. सिंभोरा येथील वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे काही दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागेल.
- किशोर रघुवंशी
उपअभियंता, मजीप्रा

Web Title: Waterborne in the district, thirsty 374 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.