चिखलदऱ्यात धबधबे कोसळू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:23+5:302021-07-14T04:16:23+5:30
पर्यटकांची गर्दी, २४ तासांत १०२ मिलिमीटर पाऊस फोटो - १३एएमपीएच०१, १३एएमपीएच०२, १३एएमपीएच०३, १३एएमपीएच०४, १३एएमपीएच०५ नरेंद्र जावरे चिखलदरा : ...
पर्यटकांची गर्दी, २४ तासांत १०२ मिलिमीटर पाऊस
फोटो - १३एएमपीएच०१, १३एएमपीएच०२, १३एएमपीएच०३, १३एएमपीएच०४, १३एएमपीएच०५
नरेंद्र जावरे
चिखलदरा : पर्यटनस्थळावर सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मंगळवारपर्यंत एकूण ३३३ मिमी पाऊस कोसळला. पर्यटनस्थळावरील भीमकुंडसह इतरही आकर्षित करणारे धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार या वीकएंडसह अद्यापही पावसाचा अंदाज घेत शेकडो पर्यटक येथे हजेरी लावत आहेत.
विदर्भातील एकमेव पर्यटनस्थळ चिखलदऱ्यात पावसाळ्याच्या दिवसात पर्यटनोत्सवच असतो. पाऊस झेलत डोंगराच्या कडांवरून फेसाळणाऱ्या धबधब्याचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा राहतो. त्यामुळे शनिवार ते सोमवारी या तीन दिवसांत सहा हजारावर पर्यटकांनी येथे भेट दिली. त्यामधून लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न चिखलदरा नगरपालिकेला पर्यटनकराच्या रूपाने मिळाले.
बॉक्स
यंदा पहिल्यांदा अतिवृष्टी
पर्यटनस्थळावर कधी चेरापुंजीसारखा धो-धो कोसळणारा पाऊस, तर कधी अंगावर मोरपीस फिरावे तसा तुषार असतो. दाट पांढरेशुभ्र धुके, क्षणात काळेकुट्ट ढग धोधो, कोसळणारे धबधबे, हिरवा गालिचा पांघरलेले उंच गगनचुंबी पहाड असा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी करीत असतानाच रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ या वेळेत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद अप्पर प्लेटो येथील पाटबंधारे विभागाच्या जलमापन केंद्रावर झाली. यंदा आतापर्यंत हा सर्वाधिक पाऊस आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंत एकूण ३३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.