पाणी भरणे हेच एकमेव काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:31 AM2019-03-31T01:31:30+5:302019-03-31T01:32:04+5:30

तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

Watering is the only work! | पाणी भरणे हेच एकमेव काम!

पाणी भरणे हेच एकमेव काम!

Next
ठळक मुद्देगावात पाण्यासाठी वणवण : शिवारात संत्राबागा आॅक्सिजनवर; नागरिकांची वणवण

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. गावातील महिलाच नव्हे, तर कर्ती पुरुष मंडळींकडेही फक्त पाण्याची तजवीज करणे, हे प्रमुख व एकमेव काम राहिले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बागायतदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावाची पाणीटंचाईमुळे रया गेली आहे.
तालुक्यातील सधन गाव म्हणून आमलाची ओळख आहे. १०० टक्के शेती संत्र्याची. प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून नावलौकिक. परंतु, सध्या या गावात पिण्याचे पाणीसुद्धा विकत घ्यावे लागत आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीलाच या गावात ग्रामपंचायतीतर्फे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. ते टँकर आता अपुरे पडत असल्यामुळे लोकांना ३० ते ४० रुपये मोजून ड्रमभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने गावात दोन कूपनलिका व चार हँडपम्प बसविले. मात्र, त्यास मर्यादा आल्या आहेत. गावाला भिवापूर तलाव व जळका धरणाच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. परंतु, जानेवारी महिन्यातच हे स्रोत आटल्याने पाणीप्रश्न भीषण झाला आहे.

गावाची लोकसंख्या पाहता, ९० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात ६० ते ८० हजार लिटर पाणी मिळत आहे. शासनांकडून अतिरिक्त टँकरची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यंदाची पाणीटंचाई भीषण आहे.
- रजनी मालखेडे
सरपंच, आमला विश्वेश्वर

संत्राबागांना टँकरने पाणी
पेयजलाचे संकट तीव्र असताना शिवारातील संत्राबागांचे हाल काही वेगळे नाहीत. शेकडो हेक्टरवरील संत्राबागा शेवटच्या घटका मोजत आहेत. दोन ते तीन हजार रुपये प्रतिटँकर दराने पाणी विकत घेऊन संत्राबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र, देऊन देऊन किती दिवस टँकरने पाणी द्यायचे, यालाही मर्यादा आहेत. यामुळे भविष्याच्या विचाराने संत्राउत्पादक हवालदिल झाले आहेत.

पाथरगाव उपसा सिंचन प्र्रकल्प केव्हा?
आमला विश्वेश्वर व लगतच्या परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे, पाणीटंचाईची समस्या निकाली निघावी, यासाठी पाथरगाव उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र, हा प्रकल्प तूर्तास निविदा प्रक्रियेत अडकला आहे. काम सुरु झाले तरी पुढील चार-पाच वर्षे प्रकल्पाचे लाभ गावकऱ्यांना मिळू शकणार नाहीत. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही. हा प्रकल्प वेळेत झाला असता, तर संत्राबागा व त्यावर आधारलेली शेती शासनाला वाचविता आली असती, असे मत ग्रामस्थ गोपाल बकाले यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Watering is the only work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.