अचलपूर-परतवाडा शहरात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:02+5:30

धरणातील या आरक्षित पाण्याची उचल करण्यापूर्वी कार्यकारी अभियंता व नगरपालिका यांच्यात पाणी उचल करारनामा केला जातो. त्यानुसारच धरणातून पाण्याची उचल केली जाते. करारनाम्याची मुदत सहा वर्षांची असते. सहा वर्षांनंतर परत काररनामा केला जातो. पण, नगरपालिकेकडून मुदत संपुष्टात आल्यानंतरही हा करारनामा अजूनपर्यंत करण्यात आलेला नाही.

Waterlogging in Achalpur-Paratwada city | अचलपूर-परतवाडा शहरात पाणीबाणी

अचलपूर-परतवाडा शहरात पाणीबाणी

Next
ठळक मुद्देपाणी उचल करारनामा संपला : नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर नगर परिषद अणि चंद्रभागा प्रकल्प पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यातील पाणी उचल करारनाम्याची मुदत संपल्यामुळे शहराचा चंद्रभागा प्रकल्पावरून होणारा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाकडून थांबविला जाऊ शकतो.
अचलपूर नगरपालिकेकडून अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरांना चंद्रभागा धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. याकरिता चंद्रभागा प्रकल्पातील ६.१५ दलघमी पाणी शासनस्तरावरून आरक्षित ठेवण्यात आले आहे. पण, धरणातील या आरक्षित पाण्याची उचल करण्यापूर्वी कार्यकारी अभियंता व नगरपालिका यांच्यात पाणी उचल करारनामा केला जातो. त्यानुसारच धरणातून पाण्याची उचल केली जाते. करारनाम्याची मुदत सहा वर्षांची असते. सहा वर्षांनंतर परत काररनामा केला जातो. पण, नगरपालिकेकडून मुदत संपुष्टात आल्यानंतरही हा करारनामा अजूनपर्यंत करण्यात आलेला नाही.
अचलपूर नगरपालिकेकडून या पाणीपुरवठ्याचे नियोजन २०२४ ची लोकसंख्या विचारात घेऊन केले गेले. २०४० च्या संभाव्य २ लाख ३३ हजार या लोकसंख्येला दररोज २ कोटी ३० लाख लिटर पाणी वितरित करण्याचे नियोजन दिले गेले, तर २००७ मध्ये १ लाख २५ हजार लोकसंख्येला दररोज १ कोटी १० लाख लिटर पाणी वितरित करण्याचे प्रस्तावित केले. या नियोजनानुसार दोन्ही शहरांतील नागरिकांना २४ तास मुबलक पाणी पुरविण्याचे स्पष्ट केले गेले. आज मात्र २४ तास तर सोडा, दिवसातून एकवेळा साधे तासभरही पाणी नागरिकांना मिळत नाही. अनेक भागात पाणीच पोहोचत नाही. धरणात पाणी असूनही नियोजनाअभावी नागरिकांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाइप लाइनवर असलेल्या मोठ्या गळतीकडे दुर्लक्ष करून त्याचे खापर नळावर बसविण्यात जाणाऱ्या टिल्लू मशीनवर प्रशासनाकडून फोडले जात आहे.

३८ लाखांचे बील
धरणातून उचल केलेल्या पाण्यापोटी ३८ लाखांचे बिल थकीत होते. साडेसात लाख अजून नगर परिषदेकडून येणे बाकी आहे्. यादरम्यान पाणी बिलाचा वेळेवर भरणा न केल्याने ५२ हजारांचे व्याजही नगरपालिकेवर आकारण्यात आले आहे.

पेचानुसार पाणी
धरणातील आरक्षित पाणी गरजेनुसार करारनाम्याच्या अनुषंगाने मीटरच्या मदतीने मोजून घेणे अपेक्षित होते. पण, अचलपूर नगर परिषदेने तसे केले नाही. पाटबंधारे विभागानेही त्याकडे दुर्लक्ष केले. मीटरऐवजी कॉक चा पेच उघडल्यावर किती पाणी मिळते, याचे मोजमाप केले गेले. एक-दोन पेच उघडले, तर किती घनमीटर पाणी दिले जाते, याचे गणित पाटबंधारे विभागाने मांडले. या अंदाजाच्या, कॉकच्या पेचाच्या गणितावर पाटबंधारे विभागाने नगर परिषदेला पाणी पुरविले आहे.

नव्या मीटरची हमी
पाणी थांबविताच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने एक महिन्यात नवे मीटर बसविण्याची हमी पाटबंधारे विभागाला दिली आहे. किंबहुना पाटबंधारे विभागाने तशी हमी नगर परिषदेकडून लेखी स्वरूपात घेतली आहे.

अधीक्षक अभियंत्यांची भेट निर्देश
पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे-देशमुख यांनी १९ मे रोजी चंद्रभागा प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या भेटीत हा प्राकार उघड झाला. पाण्याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी अभियंत्यांना दिलेत. यात एक दिवस नगरपालिकेचे पाणीही थांबविले गेले.

पाणी पुरवठा योजनेकरिता चंद्रभागा प्रकल्पातून पाण्याची उचल करण्याकरिता आवश्यक असलेल्या करारनाम्याची मुदत संपली आहे. पाटबंधारे विभागासोबत समन्वय ठेवत करारनामा नव्याने करणे गरजेचे आहे. प्रकल्पस्थळी नवे मीटर बसविण्याची हमी अचलपूर नगरपरिषदेने दिली आहे.
- शशांक फाटकर
उपविभागीय अभियंता, चंद्रभागा प्रकल्प

Web Title: Waterlogging in Achalpur-Paratwada city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.