वाठोडा खुर्दच्या लाचखोर ग्रामसेवकास अटक; ५० हजारांची स्वीकारली लाच
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 5, 2023 06:51 PM2023-09-05T18:51:18+5:302023-09-05T18:51:22+5:30
तिवसा पंचायत समितीत ‘एसीबी’ची कारवाई
अमरावती : सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामाचे बिल मंजुरीसाठी पाठविण्यासोबतच यापूर्वीच्या कामाच्या मंजूर झालेल्या बिलाच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वाठोडा खुर्द येथील ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. तिवसा पंचायत समितीच्या आवारात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एसीबीने कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली.
केशव भीमराव मदने (३७, रा. ब्राह्मणवाडा थडी) असे अटकेतील ग्रामसेवकाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांनी वाठोडा खुर्द येथे सिमेंट काँक्रिट रस्ता व नालीचे बांधकाम केले. ४ लाख ७७ हजार रुपयांच्या या कामाची नोटशिट तयार करून बिल मंजुरीसाठी पाठविण्यासोबतच मागील कामाच्या मंजूर झालेल्या बिलाच्या मोबदल्यात ग्रामसेवक केशव मदने यांनी त्यांना ९२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. पडताळणीत ग्रामसेवक केशव मदने यांनी ९२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तिवसा पंचायत समितीत तक्रारदाराकडून ५० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने ग्रामसेवक केशव मदने यांना अटक केली.