विदर्भात उष्णतेची लाट पसरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:35 PM2018-04-17T23:35:56+5:302018-04-17T23:36:12+5:30
विदर्भात उष्णतेची लाट पसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, येत्या २४ एप्रिलपर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी शहरात ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भात उष्णतेची लाट पसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, येत्या २४ एप्रिलपर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी शहरात ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सुरुवातीला उन्हाची फारसी तीव्रता जाणवली नाही. मात्र, एप्रिलच्या अखेरपर्यंत जिवाची लाही लाही करणाऱ्या उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागणार आहेत. नागपूर एअरपोर्ट येथील प्रादेशिक मौसम केंद्राने विदर्भातील काही भागात 'हिट व्हेवस'चा प्रभाव असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, १८ व १९ एप्रिलदरम्यान विदर्भात उष्णतेची लाट राहणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या अंदाजानुसार येत्या ३ ते ४ दिवसांत विदर्भातील कमाल तापमान १ ते २ डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता असून, २२ ते २४ एप्रिलदरम्यान २ ते ४ डिग्रीने तापमानात वाढ होण्याची शक्यता अनिल बंड यांनी वर्तविली आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये तापमान ४२ ते ४३ डिग्रीपर्यंत पोहोचून उन्हाच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. यादरम्यान कोणतीही विशेष हवामान प्रणाली कार्यरत नसल्याने पावसाची कुठेच शक्यता नसून, गुजरात व राजस्थानकडून वारे वाहत असल्यामुळे उष्णतामान वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.