विदर्भाच्या कॅलिफोर्नियात संत्राबागा सुकण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:32 AM2018-04-10T00:32:25+5:302018-04-10T00:32:25+5:30
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध झालेल्या वरूड तालुक्यात तीव्र पाणीटंचाईने संत्रा उत्पादकांना त्रस्त केले आहे. त्याच्या जोडीला असलेल्या वाढत्या तापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे भाडे मोजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने सुकलेल्या संत्राबागांकडे हताशपणे पाहण्याची घेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध झालेल्या वरूड तालुक्यात तीव्र पाणीटंचाईने संत्रा उत्पादकांना त्रस्त केले आहे. त्याच्या जोडीला असलेल्या वाढत्या तापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे भाडे मोजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने सुकलेल्या संत्राबागांकडे हताशपणे पाहण्याची घेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.
वरुड तालुक्यात संत्राबागांचे सर्वाधिक क्षेत्र २० हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी पावसाळ्यातील कमी पावसाने संत्र्याच्या आंबिया बहराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाईने तोंड वर काढले. विहिरी आटण्यास सुरुवात झाली, तर बोअर बंद पडले. सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १० ते १५ टक्केच जलसाठा आहे. यामुळे पाणी वापर संस्थांना पाणी देणे बंद झाले आहे. अतितापमान आणि खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्रा वाचविणे शेतकºयांना कठीण झाले आहे. याकरिता २०० ते ४०० रुपये प्रतितास दराने आवक असलेल्या ठिकाणावरून पाणी घेऊन रात्री-अपरात्री ओलीत करून संत्रा जिवंत ठेवावा लागत आहे. यामुळे पुन्हा तालुक्यावर जलसंकट उभे ठाकले आहे.
प्रकल्पांतील जलसाठा होतोय कमी
वरूड तालुक्यात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग, लघु-मध्यम सिंचन प्रकल्पांची संख्या अधिक आहे. बागायती पिके आणि संत्र्याचे क्षेत्रसुद्धा मोठे आहे. तालुक्यातील नऊ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १० ते ३० टक्क््यांपर्यंत जलसाठा आहे. मार्चपासूनच भूजल पातळी खालावत असल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संत्राबागा वाचविण्याची धडपड
पाणीटंचाईमुळे संत्रा उत्पादकांना संत्राबागा वाचविण्याची चिंता लागली असून, २०० ते ४०० रुपये प्र्रतितास दराने पाणी विकत घेऊन ओलीत करावे लागते. हजारो हेक्टरमधील संत्राबागा सुकण्याच्या मार्गावर असताना आंबिया बहरालासुद्धा ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे गळती लागली आहे.
विहिरीतून केवळ एक ते दोन तास पाणी मिळते, तर काहीवेळा तेसुद्धा मिळत नाही. यामुळे संत्राबागांच्या ओलिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. हे पीक हातचे गेल्यास पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होतील. शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- विजय श्रीराव,
संत्रा उत्पादक, पुसला