मातृत्वाचा मार्ग अजूनही खडतरच !
By admin | Published: January 12, 2016 12:15 AM2016-01-12T00:15:21+5:302016-01-12T00:15:21+5:30
अल्पवयात येणारे मातृत्व, योग्य आहाराचा अभाव आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, वर्षभरातच होणारी दुसरी गर्भधारणा अशा विविध कारणांनी आईचा मार्ग खडतर बनला आहे.
११ वर्षांची आकडेवारी : प्रसूतीदरम्यान २२ माता, २४ नवजात शिशुंचा मृत्यू
मोहन राऊ त अमरावती
अल्पवयात येणारे मातृत्व, योग्य आहाराचा अभाव आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, वर्षभरातच होणारी दुसरी गर्भधारणा अशा विविध कारणांनी आईचा मार्ग खडतर बनला आहे. मागील ११ वर्षांत जिल्ह्यात प्रसूती दरम्यान २२ माता व २४ नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़
आईपण आल्याशिवाय स्त्री जन्माचे सार्थक होत नाही़ अपत्य हे स्त्रीला निसर्गाने दिलेले मोलाचे वरदान आहे़ दाम्पत्याच्या जीवनाचा खरा अर्थ व आनंद अनुभवायचा असेल तर अपत्य हवेच आणि ते सुदृढही हवे. सुरक्षित मातृत्व असण्यासाठी मूलही वेळेवर होणे गरजेचे आहे़ परंतु अलीकडे मातृत्वाची प्रक्रिया अधिकच असुरक्षित झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गर्भधारणेच्या काळात होतेय दुर्लक्ष
पूर्वीच्या काळी गर्भवती महिलेकडून पाच ते नऊ महिन्यांपर्यंत विहिरीचे पाणी काढणे, जात्यावर दळण दळणे, घर सारवणे, कुटुंबातील सर्वांचा स्वयंपाक बनविणे, अशी कामे कुटुंबप्रमुख महिला करून घेत असत. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे गर्भावस्थेत प्रकृतीकडे महिला लक्ष देऊ शकत नाहीत. यातील दुसरी बाजू म्हणजे आजही ग्रामीण भागात मुलींना शारीरिक व मानसिक वाढ होण्यापूर्वीच बोहल्यावर चढविले जातात़ त्यामुळे गर्भधारणेत अनेक प्रकारच्या अडचणी येतात.
प्रसुतीकाळात गर्भार महिलेची विशेषत्वाने काळजी घेतली जात नाही़ गर्भधारणेपासून तर प्रसूतीपर्यंतच्या कालावधीत तपासणी न करता अनेक महिला थेट प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहेत़ योग्य ते उपचार न झाल्यामुळे जिल्ह्यात ११ वर्षांत २२ माता व २४ नवजात शिशू दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष हवे.
प्रसूती केंद्रात सुविधांचा अभाव
विशेषत: शहरातील महिलांमध्ये या घटना कमी घडल्या असल्या तरी कामानिमित्त होणारी धावपळ, रोजचा प्रवास, उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे यामुळे महिलांना धाप-दमा यांसह कावीळ सारख्या साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम प्रसूतीवेळी जाणवत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात संबंधित महिलेची प्रसूती करावी, असा शासनाचा आदेश आहे़ परंतु या उपकेंद्रात योग्य सुविधा नसल्याचे चित्र आहे़ अनेक उपकेंद्रांत प्रकाश व्यवस्था नाही, तर रात्रीच्या वेळी हे उपकेंद्र बंद असतात़ तालुका आरोग्य अधिकारी उपकेंद्राच्या आरोग्य सेविकांना नोटीस बजावतात. यानंतरही यात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे़
योग्य तपासणीची गरज
योग्य मातृत्वासाठी गर्भकाळात दोन महिन्यांतून एकदा सोनोग्राफी होणे अगत्याचे आहे. प्रसूतीसाठी सर्वसोई नियुक्त रूग्णालयात दाखल व्हावे, योग्य आहार, व्यायाम व विश्रांती घेणे गरजेचे आहे़ वेळीच रक्त, लघवी, तपासून घ्यावीत, पूर्व आजारांची कल्पना डॉक्टरांना द्यावी, आशा स्वयंसेविकांचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे, दोन मुलांमध्ये किमान २ वर्षांचे अंतर ठेवावे, जुळे बाळ असल्यास दर महिन्याला तपासणी करावी, अल्पवयात लग्न करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, उघड्यावरील अन्न पाणी घेऊ नये. या बाबींची काळजी घेतल्यास आईपणाचा मार्ग सुकर होण्यात मदत होईल.
बदलत्या जीवनशैलीत गर्भावस्थेच्या काळात महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते़ परंतु वाढत्या मानसिक तणावात काळजी घेतली जात नाही व अशातच माता किंवा शिशूचा मृत्यू होतो़ योग्य वेळी तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे़
- शोभा राठी, महिला चिकित्सक.