‘इन्सान को छोडकर हम सबकुछ खाते है’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 11:15 PM2017-08-05T23:15:06+5:302017-08-05T23:15:23+5:30
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेले परप्रांतीय विद्यार्थी श्रीनाथवाडीतील रहिवाशांसमोर साप, बेडूक व पशुपक्ष्यांना अनेकदा पकडतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेले परप्रांतीय विद्यार्थी श्रीनाथवाडीतील रहिवाशांसमोर साप, बेडूक व पशुपक्ष्यांना अनेकदा पकडतात. क्रूरपणे ठार मारतात. सततच्या या किळसवाण्या आणि गंभीर प्रकाराबाबत तेथील रहिवाशांनी त्या विद्यार्थ्यांना हटकले असता, ‘इन्सान को छोडकर हम सबकुछ खाते है’, असे उर्मट उत्तर विद्यार्थी देत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
नशेच्या अधीन असणारे काही परप्रांतीय विद्यार्थी नशा करण्यासाठी श्रीनाथवाडी परिसरातून भुतेश्वर चौकाकडे जातात. हिन्दू स्मशानभूमी मार्गावर असणाºया व उशिरा रात्रीपर्यंत सुरू राहणाºया एका अवैध दारूच्या अड्ड्यावर ते रात्री जातात.
अनेक वर्षांपासून रहिवासी त्रस्त
अमरावती : विशेष म्हणजे अवैध दारूचा अड्डा एक महिला चालवीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्या गुत्त्यावर मद्यप्राशन करून परप्रांतीय विद्यार्थी सिगारेटचे झुरके सोडत पुन्हा वसतिगृहाकडे जातात. रात्री सुरू होणारा हा सर्व प्रकार मध्यरात्र उलटेपर्यंत चालत राहतो, अशा तक्रारी तेथील नागरिकांनी केल्या आहेत.
हिंदू स्मशानभूमिच्या मार्गावरील 'ओम' नावाची पानटपरी रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असते. त्या पानटपरीवर परप्रांतीय विद्यार्थ्यांचा घोळका जमतो. सिगारेट ओढत, हुल्लडबाजी करीत ते विद्यार्थी कुणाचाही मान सन्मान न राखता वसतिगृहाकडे परततात. त्या विद्यार्थ्यांच्या अशा असंस्कृत आणि टारगटपणाच्या वागणुकीमुळे त्या परिसरातील नागरिक कमालीचे त्रासले आहेत. मोकाट सोडल्यागत परप्रांतीय विद्यार्थी वागतात. आम्ही अनेक पिढ्यांपासून येथील रहिवासी असूनही आम्हाला त्यांना दबून राहावे लागते. अनेकदा तक्रारी करण्याचा प्रयत्न केला; तथापि परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या पाठीशीच ताकद उभी केली गेली. आमचा आवाज दाबण्यात आला-हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील श्वानभक्षक परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या त्रासाने वैतागलेले अमरावतीकर ‘लोकमत’ला आपबिती कथन करीत होते. शेकडो किलोमीटर दूरून आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांची स्थानिक रहिवाशांवरील ही दादागिरी कुणाच्या बळावर वाढत आहे, हा प्रश्न आता महत्त्वाचा झाला आहे.
स्पिकर्सचा आवाज मोठा करून प्राण्यांची शिकार
परप्रांतीय विद्यार्थ्यांनी पकडलेल्या प्राण्यांचा आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून हे परप्रांतीय मोठमोठ्या आवाजात गाणे वाजवितात. प्राणीहत्या करताना त्यांचा तडफडण्याचा आवाज कोणाला जाऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जाते. हे विद्यार्थी सत्तुरसारख्या धारदार शस्त्राने पशुपक्ष्यांना ठार करून वसतिगृहासमोरील परिसरातच पार्टी झोडतात. विटांची चूल मांडून त्यावर पशुपक्ष्यांचे मांस शिजविल्या जात असल्याचेही श्रीनाथवाडीतील नागरिक सांगत आहेत.
सुरक्षा आणि संस्कृतीवर नखोरे, तरीही अभय!
हे परप्रातीय विद्यार्थी दिवसभरातून अनेक चकरा श्रीनाथवाडी परिसरात करतात. तेथील नाल्यातील वराह, साप किंवा बेडूक पकडताना परिसरातील नागरिक त्यांना नेहमीच बघतात. गुल्लेरच्या सहाय्याने झाडावरील पक्ष्यांना ते टिपतात. प्राणी, पक्षी मारून ते खातात. परप्रांतीय विद्यार्थ्यांचे असे हिंसक आणि असंस्कृत वर्तन बघून श्रीनाथवाडी परिसरातील तरुणांचे रक्त खवळते. अनेकदा स्थानिक तरूणांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता वादावादी झाली. टोळक्याने आणि घोळक्याने फिरणाºया त्या परप्रांतीय विद्यार्थ्यांसोबत वाद न घालण्याची तंबी स्थानिक तरुणांना त्यांच्या घरूनही मिळते. त्यामुळे स्थानिक तरूण नाईलाजाने मूग गिळून गप्प बसतात. त्या परप्रांतीय विद्यार्थ्यांनी श्वान खाल्ल्याची पोलीस तक्रार झाल्यावर आणि खाण्याच्या बेताने ब्राऊनीला वसतिगृहातील खोलीत बांधून ठेवल्याचे उघड झाल्यावर आता स्थानिक लोक बोलू लागले आहेत. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने अनेक वर्षे या मुद्द्याकडे जसे दुर्लक्ष केले तसेच आता अधिकृत तक्रारी होऊनदेखील दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिकांची सुरक्षा आणि अमरावतीच्या संस्कृतीवर नखोरे ओढणाºया असंस्कृत विद्यार्थ्यांच्या मुसक्या प्रभाकरराव वैद्य का आवळत नाहीत, असा सवाल स्थानिक रहिवासी उपस्थित करीत आहेत.