आम्ही शिष्यवृत्ती देतो, तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घ्या; शासनाची अभिनव योजना
By गणेश वासनिक | Published: October 14, 2023 05:30 PM2023-10-14T17:30:15+5:302023-10-14T17:31:33+5:30
राज्यात अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील ११२ विद्यार्थ्यांची निवड; सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पुढाकार
अमरावती : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींना शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत सन २०२३-२०२४ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातून ११२ विद्यार्थ्यांची नामांकित विद्यापीठ, शैक्षणिक संस्थेत निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी पदव्युत्तर, पदवी आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी निवडले गेले आहे. आम्ही शिष्यवृत्ती देतो, तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घ्या, अशी ही सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाची अभिनव योजना आहे. शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी, निकषांच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
शिष्यवृत्तीसाठी लागणारी रक्कम समाज कल्याण आयुक्तांना देण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे. परदेशात
शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण संपल्यानंतर देशाचे सेवा करण्यासाठी हमीपत्र द्यावे लागते. निवड झालेल्या शैक्षणिक संस्थेतच प्रवेश घेणे बंधनकारक आहे. परस्पर बदल केल्यास शिष्यवृत्तीची रक्कम परत घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता व ईतर अनुषंगीक खर्च शिष्यवृत्तीच्या रक्कमेत समाविष्ट करण्यात आला आहे. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी हे यूके, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, न्यूयार्क, फिलीपाईन्स या देशात उच्च शिक्षण घेणार आहेत.
अशी झाली विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्ती निवड
पदव्युत्तर पदवी कला- २, पदव्युत्तर पदवी वाणिज्य- २,पदव्युत्तर पदवी विज्ञान- २, पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी- २४, पदव्युत्तर पदवी व्यवस्थापन - ११, पदव्युत्तर पदवी विधी - ५, पीएचडी कला - ३, पीएचडी विज्ञान - ५, पीएचडी अभियांत्रिकी - ५
आंतरपरिवर्तनाने निवड
पदव्युत्तर पदवी पीजी - १४, पदव्युत्तर पदवी पीएचडी - ०१
सर्वसाधारण प्रतीक्षा यादी
पदव्युत्तर पदवी पीजी -३८
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींना शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना ही गरीब, सामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक परिवर्तनाची नांदी ठरत आहे. त्यांच्या आई-वडिलांनी परदेशात शिक्षण हे केवळ स्वप्न बघितले होते. मात्र या योजनेद्वारे परदेशात प्रत्यक्ष शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यंदा अमरावती विभागातून तीन विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत.
- सुनील वारे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, अमरावती