आपण बहीण भाऊ, शिकार मिळून खाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 05:00 AM2020-09-14T05:00:00+5:302020-09-14T05:00:31+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अति संरक्षित समजल्या जाणाऱ्या जंगलात वाघांची संख्या वाढली असल्याचे वृत्त आहे. चिखलदरा नगर परिषद अंतर्गत मरियमपूर वॉर्ड येतो. गत आठवड्यात चिखलदरा सेमाडोह मार्गावर वाघाने एका म्हशीची शिकार केली होती. सायंकाळी सात वाजता एका उंच टेकडीवर केलेली ही शिकार जबड्यात फरफटत नेत असताना रस्त्यावर कोसळली. वाघाने पुन्हा रस्त्यावर येऊन शिकार ओढत नेली.
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा/ चिखलदरा : एकाने म्हशीची शिकार केली आणि दोन दिवस चौघांनी मिळून त्यावर यथेच्छ ताव मारला. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा परिसरात स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही वाघाचे दर्शन होत असल्याने तो कुतूहलाचा विषय ठरला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अति संरक्षित समजल्या जाणाऱ्या जंगलात वाघांची संख्या वाढली असल्याचे वृत्त आहे. चिखलदरा नगर परिषद अंतर्गत मरियमपूर वॉर्ड येतो. गत आठवड्यात चिखलदरा सेमाडोह मार्गावर वाघाने एका म्हशीची शिकार केली होती. सायंकाळी सात वाजता एका उंच टेकडीवर केलेली ही शिकार जबड्यात फरफटत नेत असताना रस्त्यावर कोसळली. वाघाने पुन्हा रस्त्यावर येऊन शिकार ओढत नेली. चिखलदरा सेमाडोह मार्गावर स्थानिक रहिवासी आणि जंगल सफारीसाठी ये-जा करणाऱ्यांनी हा दुर्मिळ योग कॅमेराबध्द केला होता. दोन महिन्यापूर्वी सुद्धा एका रानडुकराच्या शिकारीनंतर परिसरातील शिवसागर पॉइंट जंगलात पर्यटकांना या वाघांनी दर्शन दिले होते. शिकारीनंतर मारलेला ताव वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला.
चौघांनी मारला दोन दिवस ताव
शिकार केलेल्या त्या म्हशीवर चार वाघांनी जंगलात नेऊन सतत दोन दिवस ताव मारला. व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी म्हशीची शिकार झाल्याचे समजताच त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यात वाघ कैद झाले आहेत. शिकारीवर ताव मारताना परिसरात वाघाची गुंज ऐकू येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
वाघीण तिचे छावे सोबत वाघ?
चार वाघ एकसोबत राहत नाहीत. वाघिन आणि तीन छावे किंवा वाघ वाघीण आणि दोन छावे असा हा परिवार असावा, असे मत मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर यांनी ‘लोकमत'ला सांगितले. वाघाचे छावे दोन वर्ष किंवा शिकार करण्यापर्यंत वाघिनीसोबत राहतात तर दोन वाघ सोबत एकच परिक्षेत्रात राहत नाहीत. हे विशेष.