महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र लढणार; समाजवादीच्या अबू आझमी यांची घोषणा
By उज्वल भालेकर | Published: March 3, 2024 08:05 PM2024-03-03T20:05:36+5:302024-03-03T20:05:45+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत संविधानविरोधी पक्षांना संपवणार.
अमरावती : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष इंडिया आघाडीमध्ये सहभागी असला तरी महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही स्वतंत्र आहोत. आमची कोणाशीही युती नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष हा धर्मनिरपेक्ष उमेदवारांच्या सोबत राहील, अशी भूमिका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी रविवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केली. सध्या देशात संविधानविरोधी लोक सत्तेत आहेत. त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्रात ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ यात्रा सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी अबू आझमी अमरावतीमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अबू आझमी म्हणाले, देशात ७० टक्के नागरिक हे शेतकरी आहेत, देशभरातील शेतकरी आज संकटात असून महाराष्ट्रात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारकडे कोणतेही धोरण नाही. देशावरील कर्ज हे चारपटीने वाढले, तर दुसरीकडे कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योगपतींचे १० लाख कोटी सरकारने माफ केले. देशातील गरिबीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून देशात धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. लव्ह जिहादच्या नावावर हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. देशातील न्यायालयाचे निर्णयदेखील भावनिक आणि आस्थेच्या नावावर दिले जात असतील, तर या देशातील अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमांना कधीच न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्ही द्वेषाच्या विरोधात हिंदू-मुस्लिम एकतेसाठी लढा देत आहोत आणि आगामी लोकसभा निवडणुकीतही आम्ही धर्मनिरपेक्ष उमेदवारांसोबत राहणार असल्याचे अबू आझमी म्हणाले. यावेळी त्यांनी कॉँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत कॉँग्रेसवरही निशाणा साधला. कॉँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या होत होत्या. आज ते मुस्लिम आरक्षण देण्याची गोष्ट करतात. परंतु जेव्हा ते सत्तेत होते तर त्यांनी मुस्लिम आरक्षण का दिले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जरी इंडिया आघाडीमध्ये समाजवादी पक्ष असला तरी महाराष्ट्रात स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नेत्यांनी दिल्याचेही अबू आझमी यांनी स्पष्ट केले.