आम्ही कोविड रुग्णालयात जाणार नाही... पॉझिटिव्ह रुग्णांनी दिला ठाम नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 07:49 PM2020-07-11T19:49:37+5:302020-07-11T19:51:02+5:30
रामपुरी कॅम्प परिसरातील ३७ व २९ वर्षीय महिला आणि ३९ वर्षीय पुरुषाने कोविड रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रामपुरी कॅम्प परिसरातील ३७ व २९ वर्षीय महिला आणि ३९ वर्षीय पुरुषाने कोविड रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुढील औषधोपचाराकरिता महापालिकेच्या आरोग्य पथकाने रामपुरी कॅम्प येथील तिघांना कोविड रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. परंतु, पथकाचा आदेश न जुमानता त्यांनी कोविड रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. रुग्णालयात न जाता आम्ही घरीच राहून उपचार करतो. रुग्णालयात असलेल्या अन्य रुग्णांमुळे आम्हाला अधिक त्रास होईल असे त्यांचे म्हणणे होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम १८८ सहकलम २, ३, ४ साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे नोंदविण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.