पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी उपक्रमांना आवश्यक निधी मिळवून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:01+5:302021-06-21T04:10:01+5:30
अमरावती : पोलिसांच्या तणावपूर्ण आयुष्यात आरोग्य व मनाचा समतोल जपण्यासाठी योग-व्यायामाबरोबरच सकारात्मकता तसेच ‘हेल्दी थिंकिंग’ची आवश्यकता असते. त्यासाठी जिल्हा ...
अमरावती : पोलिसांच्या तणावपूर्ण आयुष्यात आरोग्य व मनाचा समतोल जपण्यासाठी योग-व्यायामाबरोबरच सकारात्मकता तसेच ‘हेल्दी थिंकिंग’ची आवश्यकता असते. त्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे ‘पोलीस हेल्थ ॲप्लिकेशन’ व इतर उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतील. यापुढेही दलाच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा चांगल्या उपक्रमांना शासनाकडून आर्थिक बळ मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे आशियाना क्लब, जोग क्रीडा संकुल, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नूतनीकरण तसेच पोलीस हेल्थ ॲपचा प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., श्वेता के. हरी बालाजी, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, डॉ. अनिल रोहणकर, डॉ. स्वप्नजा निंभोरकर, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, राखीव पोलीस निरीक्षक दीपक गेडाम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे आदी उपस्थित होते.
आशियाना क्लब येथे व्हीआयपी कक्ष, विश्राम कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालयात जलद प्रतिसाद पथक व दंगा नियंत्रण पथक, पुरुष व महिला बराक, ग्रामीण अधिकारी, अंमलदारांसाठी मेस, स्मृतिभवन, उपाहारगृह, तर जोग स्टेडियम येथे वॉकिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, लॉन टेनिस कोर्ट, कबड्डी मैदान, मंथन सभागृह, अन्नपूर्णा मेस, बॉईज बराक, ४०० मीटर ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट आदी विविध सुविधांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला. श्वेता के. हरी बालाजी यांनी या सुविधांच्या नूतनीकरण व निर्मितीसाठी योगदान दिले आहे. दलाच्या ताफ्यात १२ चारचाकी व १८ दुचाकी आल्या आहेत. याप्रसंगी पालकमंत्री ठाकूर यांनी सदर सुविधांबाबत पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन. यांचे कौतुक केले. चांगल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. प्रभाकरराव वैद्य यांनीही मार्गदर्शन केले.