लग्न सोहळा ठरला कोरोना प्रसाराचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 05:00 AM2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:00:17+5:30
घाटलाडकी येथील युवक ३ जून रोजी आपल्या मामेबहिणीच्या लग्नात चांदूर बाजार शहरातील ताजनगर येथे आला होता. यात सदर युवकाचा मामाशी संपर्क झाल्याने १२ जून रोजी त्या ५५ वर्षे व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेले ४४ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. यातील रविवारी सकाळी १३ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : घाटलाडकी येथील तरुणापाठोपाठ चांदूर बाजार येथील त्याचा मामा, मावशी व मामेबहीण कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. चांदूर बाजारमध्ये झालेल्या एका लग्न सोहळ्यातून तो संसर्ग झाला असण्याची शक्यता महसूल व आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घाटलाडकी येथील युवक ३ जून रोजी आपल्या मामेबहिणीच्या लग्नात चांदूर बाजार शहरातील ताजनगर येथे आला होता. यात सदर युवकाचा मामाशी संपर्क झाल्याने १२ जून रोजी त्या ५५ वर्षे व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेले ४४ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. यातील रविवारी सकाळी १३ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये ताजनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाची मुलगी व घाटलाडकी येथील एक महिला या दोन्ही महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील उर्वरित ३१ व्यक्तींचे अहवाल अद्यापही प्रलंबित असून, रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरातील रामभट्ट प्लॉट परिसरातील महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त होताच तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी प्रफुल भोरगडे, मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी हा परिसर सील केला.
नगराध्यक्ष रवींद्र पवार व तहसीलदार अभिजित जगताप यांनी परिसरातील नागरिकांना घरातच राहून प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. तीन दिवसांपासून शहराची बाजारपेठ बंद असून, रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन बाजारपेठ आणखी काही दिवस बंद ठेवली जाणार असल्याचा निर्णय प्रशासन घेत असल्याचे कळते.
ताजनगर व रामभट्ट प्लॉट परिसरात लग्नासाठी आता नवीन परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.