आठवडाभर उसंत, तुरळक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:01 AM2019-08-12T01:01:15+5:302019-08-12T01:02:32+5:30
जिल्ह्यात २६ जुलैपासून असलेल्या झडसदृश स्थितीनंतर शनिवारी पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. आता आठवडाभर पावसाची उसंत राहणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी श्रावणसरी राहतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात २६ जुलैपासून असलेल्या झडसदृश स्थितीनंतर शनिवारी पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. आता आठवडाभर पावसाची उसंत राहणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी श्रावणसरी राहतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
गेल्या २४ तासांत धारणी तालुका वगळता पाऊस निरंक राहिला. जिल्ह्यात १ जून ते ९ आॅगस्ट या कालावधीत ५००.४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५५३.३ मिमी पावसाची नोंद झाली. ही ११०.६ टक्केवारी आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्याने पावसाची सरासरी पार केलेली आहे. विशेष म्हणजे यंदाचा निम्मा पावसाळा झाल्यानंतर दहा तालुक्यांत पावसाने सरासरी पार केलेली आहे.
यामध्ये अमरावती ११०.७ टक्के, भातकुली ६९.५, चांदूर रेल्वे १२४, धामणगाव १२८.३, अचलपूर ११८.४, चांदूर बाजार १४१.३, दर्यापूर १०९.५, अंजनगाव सुर्जी ११५.७, धारणी १३३.९ तर चिखलदरा तालुक्यात सरासरीच्या ११९.४ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र, पावसाच्या १२० पैकी ७१ दिवसा झाले असतांनाही भातकुली तालुक्यात ६९.५ टक्के, नांदगाव खंडेश्वर ९८.३, तिवसा ९६.४, मोर्शी ८९.८ व वरुड तालुक्यात ८३.८ टक्के पाऊस पडल्याने हे पाच तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.
हवामानाची सद्यस्थिती
४ तारखेला बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर गुजरात, दक्षिण राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्रात आहे. सोबत चक्राकार वारे आहेत. उत्तर बंगालच्या उपसागरावर व आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहिल्याने विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी १७ आॅगस्टपर्यंत पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहील. १२ तारखेला उत्तर बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मात्र, ही प्रणाली वायव्य दिशेने सरकरणार असल्याची शक्यता असल्याने मध्य भारतात पावसात वाढ होईल, त्याचा विदर्भाला फारसा फायदा होणार नसल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.